माजी आ. आनंदराव पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
भारतीय समाजव्यवस्थेला समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची नवी दिशा देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही तितकेच प्रभावी व प्रेरणादायी असल्याचे मत माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांनी व्यक्त केले. कराड येथे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात त्यांनी आपले विचार मांडले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कराड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष आनंदराव पाटील (नाना) यांनी उपस्थित मान्यवरांसह बाबासाहेबांना अभिवादन केले.
आपल्या भाषणात पाटील म्हणाले की, “बाबासाहेबांनी दिलेली समतेची, बंधुतेची आणि सामाजिक न्यायाची शिकवण आजच्या समाजासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या विचारांचे अनुकरण केल्यास समाज अधिक समतोल, सशक्त आणि प्रगत होऊ शकतो.”
या कार्यक्रमास आर.पी.आयचे सातारा जिल्हा सरचिटणीस आप्पासाहेब गायकवाड, नगरसेवक राहुल भोसले, भागवत कांबळे, शुभम लादे, शरद गाडे, प्रशांत थोरवडे, सचिन आढाव, प्रवीण लादे, अभिजित पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भावपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून बाबासाहेबांच्या विचारांची उजळणी करत सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला.

0 टिप्पण्या