३३ वर्षांची ज्ञानसेवा पूर्ण; बाळकृष्ण पानवळ सेवानिवृत्त
कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
शिक्षण क्षेत्रात तब्बल तीन दशकांहून अधिक काळ निष्ठेने कार्य करत विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारे कृष्णा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे गणित विषयाचे शिक्षक बाळकृष्ण सीताराम पानवळ यांचा सेवानिवृत्तीनिमित्त ओगलेवाडीत भव्य सत्कार करण्यात आला. यशवंत शिक्षण संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते पानवळ दांपत्याचा सन्मान करण्यात आला.
आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत पानवळ यांनी केवळ गणित विषयाचे अध्यापन केले नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.
कार्यक्रमात टिळक हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य गणपतराव कणसे यांनी आपल्या मनोगतात पानवळ यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “पानवळ हे विद्यार्थ्यांशी आत्मीय नाते जपणारे, कुटुंबवत्सल आणि बहुआयामी शिक्षक होते. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही त्यांची विशेष आवड होती, जी त्यांनी विद्यार्थ्यांमध्येही रुजवली.”
या प्रसंगी उपमुख्याध्यापक शरद शिंदे, माजी शिक्षक हेमंत घोणे, बाबा कुलकर्णी, विजय कुलकर्णी यांनीही आपल्या आठवणींना उजाळा दिला. कुटुंबीयांतर्फे मयुरा पानवळ आणि डॉ. दुर्वांक पानवळ यांनी भावनिक शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली.
या सत्कार समारंभाला कराड नगरपालिकेचे नगरसेवक विजयसिंह यादव, पंचायत समिती सदस्य सिद्धार्थ चव्हाण यांच्यासह पानवळ यांचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पोपटराव काटकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय बाबर यांनी मानले. शिक्षक म्हणून आदर्श ठरलेल्या पानवळ यांच्या कार्याचा हा गौरव सोहळा उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला.

0 टिप्पण्या