चांगभलं प्रतिनिधी | पलूस

लोकशाही प्रेमी जन संघर्ष समितीच्यावतीने देशातील ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याच्या मागणीसाठी पलूस (जि. सांगली ) येथे निदर्शने करण्यात आली. सरकारच्या विरोधी धोरणाबद्दल हातात फलक घेऊन निषेध करण्यात आला. घोषणा देण्यात आल्या.



यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना केंद्रसरकारच्या जनविरोधी धोरणावर कडक ताशेरे ओढून केंद्र सरकारने संविधानिक लोकशाही मूल्ये पायदळी तुडवू नयेत, असे आवाहन केले. सोनम वांगचुक यांच्या मागण्या त्वरित मान्य करून एका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचे प्राण वाचवा, अशी आग्रही मागणी करण्यात आली.


यावेळी पुरोगामी चळवळीचे संघटक ज्येष्ठ विचारवंत भाई व्ही वाय पाटील, महामार्ग संघर्ष समितीचे नेते डॉ. अमोल पवार, डॉक्टर्स असोसिएशन डॉ. मिनाक्षी सावंत, डॉ. साधना पवार, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नेते मारुती शिरतोडे, पलूसचे ज्येष्ठ नेते मानसिंगनाना पाटील, पलूस नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते दिगंबर पाटील, पलूस नगर परिषदेचे गटनेते सुहास पुदाले , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरीशकाका गोंदील, दादासाहेब पाटील, शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे ॲड. दीपक लाड, डॉ.बी एन पवार , नगरसेवक धनाजी कुंभार, समाजवादी प्रबोधिनीचे संघटक प्रा. आदम पठाण आदींनी मनोगत व्यक्त केले. 


या देशाच्या शिक्षण व्यवस्थेत मोठा घोळ दिसून येत असून नीट परीक्षेचे पेपर फुटल्यामुळे 22 लाख विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.या विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी घेऊन सरकारने कठोर पावले उचलायला हवीत आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी गेले 20 दिवस दिल्ली येथील जंतर-मंतरवर आमरण उपोषणास बसलेले सोनम वांगचुक यांच्या आंदोलनास आम्ही पलूस तालुक्यातील सर्व लोकशाही प्रेमी जनसंघर्ष समितीच्यावतीने जाहीर पाठिंबा देत आहोत, असे सांगत , केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून केली.



या निदर्शनात शिक्षक नेते उत्तम पाटील, बाबासाहेब लाड, नितीन चव्हाण, राम चव्हाण, तसेच दीपक पवार, देवकुमार दुपटे, मारुती सावंत, हिम्मतराव मलमे, आदित्य माळी, डॉ. संतोष देसाई, संपतराव पवार, माजी नगरसेवक संदीप शिसाळ , डॉ. माधवी जाधव, डॉ. देशमुख, कॉम्रेड अर्जुन जाधव, हर्षवर्धन पाटील, विकास कांबळे, नितीन खारकांडे यांच्यासह शेकडो जणांनी निदर्शनात भाग घेतला.


➖➖➖➖➖➖➖

#सोनमवांगचुक #लोकशाहीप्रेमीजनसंघर्ष #पलूस #आंदोलन

#चांगभलंन्यूज #चांगभलंसाप्ताहिक #चांगभलंन्यूजपेपर