उदयसिंह पाटील-उंडाळकर सहकारातील 'राजकीय कोंडी' फोडणार..?
हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच कराड तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. उमेदवारीच्या चर्चेला आता पक्षीय समीकरणांची किनार मिळाली असून, कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आज पत्रकारांशी बोलताना केलेल्या सूचक विधानामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील स्थानिक राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
कराड येथे आज एका कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेल्या आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी 'उमेदवार म्हणून आमदार डॉ. अतुलबाबा भोसले आणि अॅड. उदयसिंह पाटील' यांची नावे चर्चेत असल्याबाबत पत्रकारांकडून थेट प्रश्न विचारण्यात आला. अर्थातच या प्रश्नाला यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीचा संदर्भ होता. मात्र या प्रश्नाला उत्तर देताना आमदार डॉ. भोसले म्हणाले, “ जिल्हा बँकेला भाजप स्वतंत्रपणे लढणार असेल, तर उदयसिंह पाटील यांना भाजपमधून उभे राहून निवडणूक लढवावी लागेल. अन्यथा पक्ष ज्या उमेदवाराला संधी देईल, त्याचेच आम्हाला काम करावे लागेल.”
आमदार भोसले यांच्या या वक्तव्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कराड दक्षिण मतदारसंघातील उमेदवारीबाबत आणि पॉलिटिकल समीकरणाबाबतच्या चर्चेला वेगळे वळण मिळाले आहे. विशेषतः अॅड. उदयसिंह पाटील हे दिवंगत अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित स्थानिक नेते असल्याने, त्यांना भाजपच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा पर्याय आमदारांनी सूचित केल्याने कराडच नव्हे तर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राजकीय वैमनस्य बाजूला ठेवून यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला सहकार्य केले होते. या राजकीय सहकार्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उदयसिंह पाटील - उंडाळकर यांच्या उमेदवारीला भाजपच्या भोसले यांच्या गटातून स्थानिक पातळीवर पाठिंबा मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.
मात्र, आता आमदार अतुलबाबा भोसले यांनी केलेल्या विधानामुळे ही 'राजकीय सेटलमेंट" पक्षीय चौकटीत अडसर ठरण्याची शक्यता वाढली आहे. भाजपकडून स्वतंत्र उमेदवार देण्याची भूमिका घेतली गेली, तर उदयसिंह पाटील यांना भाजपचा किंवा भोसले गटाचा पाठिंबा हवा असेल तर त्यांना भाजपच्या चिन्हावर किंवा भाजपच्या माध्यमातून निवडणूक लढवावी लागेल, असे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे. त्यातूनही जिल्हा बँक निवडणुकीला भाजप महायुती म्हणून सामोरे जाते की स्वतंत्रपणे यावर निवडणुकीची गणिते अवलंबून राहणार आहेत.
जयकुमार गोरे यांच्या विधानानंतर चर्चेला वेग...
काही दिवसांपूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजपकडून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे भाजप जिल्हा बँकेच्या निवडणुकीत स्वतंत्र राजकीय ताकद उभी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर कराड दौऱ्यावर आलेल्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनीही या संभाव्य राजकीय भूमिकेवर भाष्य करत, “आम्ही तुम्हाला या निवडणुकीत तुमच्याबरोबर का चालत नाही, असे दोन्ही मंत्र्यांना विचारू; त्यानंतर मात्र आम्हीही गप्प बसणार नाही,” अशी भूमिका मांडली होती.
त्यातच आता कराड दक्षिणेतून आमदार अतुलबाबा भोसले यांनी उदयसिंह पाटील यांच्या संभाव्य उमेदवारीच्या प्रश्नावर स्पष्टपणे पक्षीय भूमिका अधोरेखित केल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय गणिताकडे कराडसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
प्रश्न आता उदयसिंह पाटील यांच्या भूमिकेचा....
कृष्णा कारखाना निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय जवळकीच्या पार्श्वभूमीवर उदयसिंह पाटील यांची जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील भूमिका काय राहणार, हा सध्या महत्त्वाचा प्रश्न आहे. ते भाजपच्या माध्यमातून निवडणूक लढविणार का?, की राष्ट्रवादी काँग्रेससोबतच राहणार? किंवा महायुतीतील चर्चेतून अन्य काही राजकीय समीकरण आकाराला येणार, याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ एका जागेची निवडणूक नसून सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय प्रभाव केंद्र म्हणून महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे कराड दक्षिणेतील उमेदवारीवरून सुरू झालेली ही चर्चा आगामी काळात जिल्हा पातळीवरील राजकीय समीकरणांवर कितपत परिणाम करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आमदार अतुलबाबा भोसले यांच्या आजच्या वक्तव्याने कोणतीही अंतिम उमेदवारी किंवा पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर झालेली नसली, तरी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कराड दक्षिणेतील राजकीय समीकरणे कोणत्या दिशेने जात आहेत, याचा एक महत्त्वाचा संकेत मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आता अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची भूमिका आणि भाजप-राष्ट्रवादीतील स्थानिक राजकीय समीकरणे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
➖➖➖➖➖➖
#कराड #साताराजिल्हाबँकनिवडणूक #अतुलबाबाभोसले #उदयसिंहपाटीलउंडाळकर #चांगभलं #चांगभलंन्यूज #पॉलिटिकलस्टोरी #चांगभलंन्यूजपेपर #ChangbhalaNews

0 टिप्पण्या