🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

कराडच्या नवीन जलशुद्धीकरण केंद्रातील साहित्य चोरीची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करा

 - भाजपचे गटनेते विजय वाटेगावकर यांची निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी




हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड

कराड नगरपरिषदेच्या नवीन जलशुद्धीकरण केंद्रातून नगरपरिषदेच्या मालकीचे साहित्य चोरीस गेल्याची माहिती समोर येत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपचे कराड नगरपालिकेतील गटनेते विजय वाटेगावकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी कराड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन चोरीस गेलेल्या साहित्याची सविस्तर माहिती, आर्थिक नुकसानीचे मूल्यांकन आणि संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, विजय वाटेगावकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कराड नगरपालिकेतील सर्व नगरसेवकांनी नवीन जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन जिथे चोरी झाली आहे तेथील पाहणी केली. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांना भेटून वाटेगावकर यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना घटनेच्या चौकशीबाबत निवेदन दिले.


नगरपरिषदेच्या सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याचे वाटेगावकर यांनी निवेदनात म्हटले आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून नेमके कोणते व किती साहित्य चोरीस गेले आहे, याची वस्तूनिहाय सविस्तर यादी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच चोरीस गेलेल्या प्रत्येक साहित्याची खरेदी किंमत, लेखा मूल्य आणि सद्य अंदाजे बाजारभाव याबाबत स्वतंत्र माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.

चोरीस गेलेल्या साहित्याची नोंद नगरपरिषदेच्या मालमत्ता नोंदवही, स्टॉक रजिस्टर किंवा अन्य संबंधित अभिलेखांमध्ये करण्यात आली होती का, याची माहिती तसेच संबंधित नोंदींच्या प्रती उपलब्ध करून द्याव्यात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदर साहित्य कधीपासून उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आणि चोरीची घटना कोणत्या कालावधीत घडली असण्याची शक्यता आहे, याचीही माहिती मागण्यात आली आहे.




या घटनेबाबत नगरपरिषदेच्या वतीने पोलिस ठाण्यात तक्रार अथवा FIR दाखल करण्यात आली आहे का, असल्यास त्याची प्रत, गुन्हा क्रमांक आणि दिनांक उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची विभागीय अथवा अंतर्गत चौकशी झाली असल्यास चौकशी अधिकारी कोण होते, चौकशीचा अहवाल काय आहे आणि त्यामध्ये कोणाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे, याची माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.

जलशुद्धीकरण केंद्रातील नगरपरिषदेच्या साहित्याच्या सुरक्षा व देखरेखीची जबाबदारी कोणत्या अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार अथवा सुरक्षा यंत्रणेवर सोपविण्यात आली आहे, याची माहिती देण्याबरोबरच संबंधित कालावधीतील सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, ड्युटी चार्ट, हजेरीपत्रक आणि शिफ्टनिहाय नियुक्तीची माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
जलशुद्धीकरण केंद्रात CCTV कॅमेरे कार्यरत आहेत का, असल्यास संबंधित कालावधीतील CCTV फुटेज सुरक्षित ठेवण्यात आले आहे का, याची माहितीही मागण्यात आली आहे. चोरीस गेलेल्या साहित्याची एकूण अंदाजे किंमत आणि त्यामुळे नगरपरिषदेचे झालेले आर्थिक नुकसान याचा स्वतंत्र अहवाल देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

दरम्यान, चोरीच्या घटनेबाबत प्राथमिकदृष्ट्या कोणाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी अथवा कंत्राटदारावर कोणती प्रशासकीय किंवा कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे, याची माहिती देण्याची मागणी वाटेगावकर यांनी केली आहे. भविष्यात नगरपरिषदेच्या मालमत्तेची अशा प्रकारे चोरी किंवा नुकसान होऊ नये, यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याबाबत कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या अथवा प्रस्तावित आहेत, हेही स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नगरपरिषदेची मालमत्ता ही सार्वजनिक मालमत्ता असून ती नागरिकांच्या करातून निर्माण झालेल्या निधीशी संबंधित आहे. त्यामुळे या प्रकरणातील कोणतीही बाब दडपली जाऊ नये, चोरीस गेलेल्या साहित्याची वस्तुनिष्ठ तपासणी करून आर्थिक नुकसानीचे मूल्यांकन करावे आणि दोषी व्यक्तींची जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी मागणी विजय वाटेगावकर यांनी केली आहे.


➖➖➖➖➖➖

#कराडन्यूज #कराडनगरपालिका #भाजप #विजयवाटेगावकर

#चांगभलंन्यूज #Karadkar #ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या