रत्नागिरी गोडावूनच्या पाठीमागील परिसरात कारवाई; गांजाचा पुरवठा आणि वाहतूक करणाऱ्यांचा शोध सुरू
चांगभलं प्रतिनिधी | कराड
कराड शहरातील रत्नागिरी गोडावूनच्या पाठीमागील परिसरात उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड विभाग यांच्या पथकाने छापा टाकून ९६ हजार १०० रुपये किमतीचा १ किलो ९२२ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ कॅनाबीस (गांजा) जप्त केला. ही कारवाई सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आली. या प्रकरणी एका संशयित आरोपीविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गांजाचा पुरवठा व वाहतूक करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री संभाजीराव पाटील या सातारा जिल्ह्यातील अॅन्टी नार्कोटिक्स अवेअरनेस कॅम्पेनच्या नोडल अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
दि. १२ ऑक्टोबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कराड येथील रत्नागिरी गोडावूनच्या पाठीमागे राहत्या घराजवळ संशयित अशोक नंदाप्पा बिराजदार (रा. रेठरेकर कॉलनी, मुजावर कॉलनी रोड, कराड) हा गांजा विक्रीसाठी घेऊन आला आहे.
या माहितीच्या आधारे राजश्री पाटील यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांच्या अधिपत्याखालील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत १.९२२ किलो वजनाचा आणि ९६ हजार १०० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस अंमलदार हर्षल साळुखे यांनी सरकारतर्फे कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार एका संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात गांजाचा पुरवठा करणारे तसेच त्याची वाहतूक करणारे कोण आहेत, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
या पथकाचा कारवाईत सहभाग
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री संभाजीराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, पोलीस हवालदार असिफ जमादार, प्रविण पवार, सागर बर्गे, दीपक कोळी, हर्षल साळुखे आणि मयूर देशमुख यांनी ही कारवाई केली.
➖➖➖➖➖➖
#चांगभलंन्यूज #कराड #सातारा #गांजाजप्त #अंमलीपदार्थविरोधीमोहीम #कराडपोलीस #सातारा पोलीस #CrimeNews #KaradNews #SataraNews #AntiNarcotics #MaharashtraPolice

0 टिप्पण्या