🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

उसाला प्रतिटन ७ हजार रुपये दर द्या; अन्यथा साखर कारखाना प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडणार

 चंद्रकांत पवार, विजय पाटील यांचा इशारा; निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन




चांगभलं प्रतिनिधी | सातारा

उसाला प्रतिटन ७ हजार रुपये दर जाहीर करावा, तसेच मागील बिलातील २ हजार रुपये शेतकऱ्यांना द्यावेत, या मागणीसाठी शिवराष्ट्र युवक संघटना व शिवराष्ट्र शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास साखर कारखान्यांचे संचालक, चेअरमन व पदाधिकाऱ्यांना रस्त्यावरच जाब विचारून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवराष्ट्र युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत पवार व शेतकरी संघटना क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी दिला. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.
शेतकरी वर्षभर शेतात तेरा-तेरा तास राबूनही त्यांच्या हातात अपेक्षित उत्पन्न पडत नाही. दुष्काळ, पाणीटंचाई, वीजकपात, वन्य प्राण्यांमुळे पिकांचे होणारे नुकसान आणि डोक्यावर वाढत जाणारे कर्ज अशा अनेक संकटांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी हतबल होत असून, शेतकऱ्यांच्या या अवस्थेला शासनाचे धोरण जबाबदार असल्याची टीका चंद्रकांत पवार यांनी केली.
यावेळी बोलताना चंद्रकांत पवार म्हणाले की, उसाला योग्य दर मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त, जिल्हाधिकारी, सचिवालय, मुख्यमंत्री कक्ष तसेच साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि चेअरमन यांच्याकडे अनेक वेळा निवेदने व तक्रारी देण्यात आल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत अपेक्षित निर्णय होत नसल्याने आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे.
आंदोलनादरम्यान कोणत्याही वाहनाचे, ट्रॅक्टरचे अथवा ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे नुकसान केले जाणार नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होईल, असे कोणतेही कृत्य केले जाणार नाही. मात्र, साखर कारखान्यांचे संचालक, चेअरमन व पदाधिकाऱ्यांना रस्त्यावरच जाब विचारण्यात येईल. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास त्यांच्या वाहनांसमोर आंदोलन करून गोबर फेक निषेध कार्यक्रम राबविण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला. या इशाऱ्याची शासन व प्रशासनाने नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
उसाला सात हजार रुपये दर देण्याची मागणी
साखर कारखाना प्रशासन व शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन उसाला प्रतिटन ७ हजार रुपये दर जाहीर करावा. मागील काळात साखरेचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे मागील बिलातील २ हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात यावेत. यंदा उसाचे क्षेत्र कमी असल्याची बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणारा दर तातडीने जाहीर करावा, अशी मागणी संघटनांच्या वतीने करण्यात आली.
कवितेतून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या
शिवराष्ट्र युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत पवार यांनी कवितेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची व्यथा, त्यांच्यावरील संकटे आणि उसाला सात हजार रुपये दर मिळण्याची मागणी प्रभावीपणे मांडली.
“ऊस दरासाठी पेटली मशाल, शेतकरी आता पेटणार आहे, रुपये ७००० दराचा हक्क आपला, कारखानदाराला नडणार आहे, न्याय न मिळाल्यास गाड्या फुटणार आणि गोबरांचा वर्षाव होणार आहे,” अशा शब्दांत त्यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.
शासनकर्ते, साखर कारखान्यांचे संचालक मंडळ आणि प्रशासनाने शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहावे. शेतकऱ्यांच्या घामाची किंमत करून प्रतिटन सात हजार रुपये दर त्यांच्या पदरात टाकावा, असे आवाहन त्यांनी केले.
“वर आभाळ रुसलेलं, खाली जमीन फाटलेली, बळीराजाची दैना आज उघड्यावर आलेली,” अशा शब्दांत त्यांनी दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती आणि शेतीच्या नुकसानीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे चित्र मांडले.
कधी दुष्काळाची झळ, तर कधी नैसर्गिक आपत्ती; वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान, वाढते कर्ज आणि विस्कटलेला संसार यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. रात्रंदिवस शेताची राखण करूनही शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शासन, प्रशासन आणि कारखानदारांच्या संचालक मंडळाने शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेऊन त्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला द्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
“भीक नको, हवी आहे केवळ कष्टाची ती कदर; शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे सात हजाराचा दर,” या शब्दांत त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.

निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन देताना शिवराष्ट्र युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत पवार, शेतकरी संघटना क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, खाशाबा जाधव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन पाटील, सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच नारायण सुर्वे महाराज आणि ॲड. अश्विनी पाटील उपस्थित होते.
तसेच शिवराष्ट्र शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रेमजीत पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष स्वरूप निकम, प्रदेश उपाध्यक्ष सदाशिव सोनतळे, सरचिटणीस शोभाताई सुतार, सचिव दीपक कुंभार, कार्यकारिणी सदस्य सचिन ढगाले, विजय गायकवाड, गिरीश मोहिरे, संजय तांबे, संतोष गोळे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
उसाला प्रतिटन सात हजार रुपये दर मिळावा आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी शिवराष्ट्र शेतकरी संघटना व शिवराष्ट्र युवक संघटना आता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला.
➖➖➖➖➖
#ऊसदर #ऊसदरआंदोलन #शेतकरी #७०००रुपयेऊसदर #शिवराष्ट्रयुवकसंघटना #शिवराष्ट्रशेतकरीसंघटना #साखरकारखाना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या