हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड
कराड शहरातील सर्किट हाऊससमोरील रस्त्याची दुरवस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या संरक्षक भिंतीला पडलेल्या भेगेची पाहणी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आज सकाळी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच कराड नगरपालिका प्रशासनातील संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
सर्किट हाऊसकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिक तसेच जुन्या पुलावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. भोसले यांनी रस्त्याची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून सद्यस्थितीची माहिती घेतली.
या रस्त्याच्या कामासाठी राज्य सरकारकडून 69 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, पावसाळा संपल्यानंतर रस्त्याचे नवीन काम हाती घेण्यात येणार असल्याचे आमदार डॉ. भोसले यांनी सांगितले. मात्र, तोपर्यंत नागरिकांना खड्ड्यांचा त्रास होऊ नये, यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पॅचवर्क करून खड्डे बुजविण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. हे काम उद्यापासून सुरू होणार असून, खड्डे भरताना रस्त्याची लेव्हल योग्य ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, “कराडच्या रस्त्याचे काम उद्यापासून सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात खड्डे भरण्याचे आणि पॉटहोल्सचे काम केले जाईल. पावसाळ्यानंतर या रस्त्याचे पूर्णपणे नवीन काम सुरू करण्यात येईल.”
शासकीय विश्रामगृहाच्या प्रवेशद्वाराजवळील संरक्षक भिंतीला पडलेल्या भेगेचीही आमदारांनी पाहणी केली. या भिंतीच्या तात्पुरत्या डागडुजीचे काम दोन दिवसांत करून त्यावर रंग देण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
“कराडला राज्याच्या नकाशावर विशेष महत्त्व आहे. मुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यातील विविध नेते कराडमध्ये येत असतात. त्यामुळे शासकीय विश्रामगृहाकडे येणारा रस्ता आणि परिसर व्यवस्थित असणे आवश्यक आहे. माध्यमांनी हा विषय मांडल्यामुळे तो माझ्यापर्यंत आला आणि त्यानंतर पाहणी करून तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना दिल्या,” असे डॉ. भोसले यांनी सांगितले.
भविष्यात शासकीय विश्रामगृहाच्या सुधारित किंवा अतिरिक्त विंगचे काम हाती घेताना संरक्षक भिंतीचाही समावेश अंदाजपत्रकात करण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली. नवीन भिंत उभारून विश्रामगृहाचा प्रवेशद्वाराचा परिसर अधिक सुशोभित आणि आकर्षक करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पावसाळा संपल्यानंतर रस्त्याचे कायमस्वरूपी नवीन काम करण्यात येणार असून, तोपर्यंत तात्पुरत्या डागडुजीमुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
➖➖➖➖➖➖
#कराड #अतुलबाबाभोसले #भाजप #कराडदक्षिण #चांगभलं #चांगभलंन्यूज #चांगभलंन्यूजपेपर #ChangbhalaNews


0 टिप्पण्या