चांगभलं प्रतिनिधी | कराड
कराड तालुक्यातील नारायणवाडी-पाचवडफाटा येथील ओम इंडस्ट्रीज वर्कशॉपमधून सुमारे ४ लाख १० हजार ६७५ रुपये किमतीचे कॉपर वायरचे बंडल चोरीला गेल्याच्या गुन्ह्याचा कराड तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने छडा लावला आहे. या प्रकरणात कराड तालुका पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील व सध्या तडीपार असलेल्या सराईत आरोपीसह त्याच्या साथीदारांचा सहभाग निष्पन्न झाला असून, चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नारायणवाडी-पाचवडफाटा येथे असलेल्या ओम इंडस्ट्रीज या वर्कशॉपमधून दि. २२ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४ लाख १० हजार ६७५ रुपये किमतीचे कॉपर वायरचे बंडल चोरून नेले होते. याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४६०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४), ३०५, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक माहिती तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी हा कराड तालुका पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील आणि सध्या तडीपार असलेला सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो सुंदरनगर, उत्तर पार्ले येथे आपल्या घरी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तेथे सापळा रचला.
पोलिसांनी सुंदरनगर, उत्तर पार्ले येथून संशयितास ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी सुनिल ताराचंद चव्हाण (वय २८, रा. सुंदरनगर, उत्तर पार्ले, ता. कराड, जि. सातारा) या संशयीताचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला. त्याने हा गुन्हा आपल्या साथीदारांसोबत केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणात निखील उमाजी बुधावले (वय २३, रा. बुधावलेवाडी, पो. विसापूर, ता. खटाव), साहील नितीन जाधव (वय २१, रा. गांववाडी, पो. विसापूर, ता. खटाव), विक्रम भानुदास जाधव (वय २२, रा. गांववाडी, पो. विसापूर, ता. खटाव) आणि अजय संभाजी मदने (रा. डिस्कळ, ता. खटाव) यांचीही नावे पोलिसांच्या तपासात समोर आली. या संशयितांमधील चौघांना अटक करण्यात आली असून, चोरीस गेलेला ४ लाख १० हजार ६७५ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन भिलारी करीत आहेत.
ही कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील तसेच कराड तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन येळवे, पोलीस हवालदार सचिन निकम, पोलीस नाईक सागर शिवदास, पोलीस नाईक किरण बामणे, पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल गाडे आणि पोलीस कॉन्स्टेबल मयुर देशमुख यांनी ही कारवाई केली.
कराड तालुका पोलिसांच्या या कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावून चोरीस गेलेला लाखो रुपयांचा मुद्देमाल परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.
➖➖➖➖➖➖➖
#Karadcrime #KaradPolice #ChangbhalaNews

0 टिप्पण्या