चांगभलं प्रतिनिधी | कराड
जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जम्मू सेक्टरचे पोलीस महानिरीक्षक (IG) म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे श्री.अमोल होमकर, IPS यांचा कराड येथे त्यांच्या निवास्थानी माजी आमदार आनंदराव पाटील ‘नाना’ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जम्मू-काश्मीरचे IG श्री. अमोल विनायक होमकर यांच्या सत्कार प्रसंगी आ.आनंदराव पाटील नाना, श्री.शंतनू कालेकर, सुदेश देवाडिगा, युवा नेते प्रतापसिंह पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आनंदराव पाटील म्हणाले, कराडच्या भूमीतून घडलेले सुपुत्र अमोल होमकर यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर भारतीय पोलीस सेवेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.तसेच त्यांचे वडील स्व.विनुकांत होमकर साहेब हे सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या उत्पादन शुल्क या विभागामध्ये इन्स्पेक्टर म्हणून त्यांनीही उल्लेखनीय कार्य केले.तेंव्हापासुन होमकर कुटुंबियांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, असेही ते म्हणाले.
देशातील अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या मणिपूर आणि नागालँड राज्यांच्या सुरक्षेची व कायदा-सुव्यवस्थेची धुरा त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी झारखंडमध्ये 'आयजी ऑपरेशन्स' म्हणून काम करताना बुढा पहाड, पारसनाथ यांसारख्या भागांत नक्षलविरोधी मोहिमांमध्ये ऐतिहासिक व यशस्वी कामगिरी बजावली आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल व उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना केंद्र सरकारकडून पोलीस पदक व इतर सन्मान प्राप्त झाले आहेत.
यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील नाना यांनी श्री.होमकर साहेब यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कराडच्या भूमिपुत्राने देशसेवेत बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका ही कराडकरांसाठी अभिमानाची बाब आहे. जम्मू-काश्मीर येथे कराडमधून कोणी नागरिक किंवा परिचित गेले असता, ‘आपल्या गावचे लोक आले आहेत’ या आपुलकीच्या भावनेतून अमोल होमकर साहेब हे त्यांची विशेष काळजी घेत असतात. अत्यंत जबाबदारीच्या पदावर कार्यरत असूनही कराडकरांशी असलेला हा जिव्हाळा आणि आपुलकी त्यांनी कायम जपली आहे. त्यांच्या या आपुलकीच्या स्वभावामुळे जम्मू-काश्मीरमध्ये गेलेल्या अनेक कराडकरांना आपलेपणाची भावना मिळत आहे , असे गौरवोद्गार यावेळी आनंदराव पाटील यांच्याकडून व्यक्त करण्यात आले.
➖➖➖➖➖➖
#कराड #आनंदरावपाटील #KaradNews #AmolHomkar

0 टिप्पण्या