सर्वाधिक ऊस उत्पन्न काढणाऱ्या शेतकऱ्यांसह गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार
चांगभलं प्रतिनिधी | कराड
कराड तालुक्यातील नांदगाव ग्राम विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि., नांदगावची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी संस्थेच्या कार्यालयात चेअरमन श्री. संजय बापू पवार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. यावेळी संस्थेच्या सभासदांना चालू वर्षासाठी १० टक्के लाभांश देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
सभेस व्हा. चेअरमन श्री. हिंदुराव बंडू गुरव, सर्व संचालक, सभासद व हितचिंतक यांच्यासह ऑडिटर श्री. अविनाश महालिंग ढोबळे, विकास अधिकारी श्री. एम. टी. शेवाळे तसेच रयत सहकारी साखर कारखाना लि.चे कार्यकारी संचालक श्री. रवींद्र देशमुख, सरपंच हंबीरराव पाटील, माजी उपसरपंच अधिकराव पाटील, माजी सचिव मारुती पाटील, कराड पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ . नरेंद्र माळी आदी मान्यवरांसह संस्थेचे सर्व संचालक, सभासद उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थेला लेखापरीक्षणामध्ये ‘अ’ वर्ग प्राप्त झाला आहे. संस्थेचे कामकाज व आर्थिक व्यवहार नीटनेटकेपणे सुरू असल्याची ही पोहोचपावती असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गतवर्षी संस्थेने सभासदांना ९ टक्के लाभांश दिला होता. चालू वर्षी त्यामध्ये वाढ करून १० टक्के लाभांश देण्याचे निश्चित करण्यात आले.
यावेळी नांदगाव गावातील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच दिवंगत शामराव कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ श्री. टी. के. पाटील यांच्या सौजन्याने आणि रयत साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक रवींद्र देशमुख यांच्या शुभहस्ते ऊस उत्पादनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. पांडुरंग पाटील यांनी केले. रयत साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक रवींद्र देशमुख व श्री. टी. के. पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संस्थेचा वार्षिक अहवाल सचिव श्री. भूषण भगवान पाटील यांनी सादर केला. व्हा. चेअरमन श्री. हिंदुराव बंडू गुरव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा गौरव....!
कै. शामराव कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ ऊस उत्पादनात चांगली कामगिरी करणाऱ्या गावातील शेतकऱ्यांचा, सन्मानचिन्ह, रोख रक्कम, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक शशिकांत जनार्दन माळी, द्वितीय क्रमांक मारुती निवृत्ती पाटील, तृतीय क्रमांक मानसिंग आनंदा पवार यांनी मिळविला. उत्तेजनार्थ चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस वैभव दिनकर पाटील यांना देण्यात आले. श्री. टी. के. पाटील यांच्या सौजन्याने आयोजित या गौरव सोहळ्यात रयत साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. रवींद्र देशमुख यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
गावच्या सुपुत्राचा सत्कार....!
नांदगावचे सुपुत्र तथा पत्रकार हैबतराव आडके यांना मुक्त सामाजिक विकास प्रतिष्ठान, कराड यांच्याकडून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार’ मिळाल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थ तसेच नांदगाव ग्राम विकास सेवा सोसायटीच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
➖➖➖➖➖➖
#नांदगाव #NadgonNews #ChangbhalaNews
#नांदगावग्रामविकाससेवासोसायटी #चांगभलंन्यूज





0 टिप्पण्या