🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

मुक्ता प्रतिष्ठानच्यावतीने ९ मान्यवरांचा विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मान

 


कराडला पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात; महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याचे मान्यवरांचे आवाहन

चांगभलं प्रतिनिधी | कराड

सामाजिक, पत्रकारिता, साहित्य, कला, उद्योग आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ९ मान्यवरांचा मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठान, कराड यांच्यावतीने विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंती व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी (दि. २९) येथील नवीन शासकीय विश्रामगृहातील सभागृहात उत्साहात पार पडला.

कार्यक्रमास काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा ओबीसी विभागाचे नेते भानुदास माळी, डीपीआयचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे, महात्मा फुले जयंती महोत्सव समिती महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अॅड. संभाजीराव मोहिते, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष झाकीर पठाण, नासिरभाई इनामदार, दिग्विजय सूर्यवंशी, जगन्नाथ कुंभार, देवदास माने, राहुल काळोखे, सुरेश बडेकर, भास्कर तडाके, चंद्रकांत साठे, रामभाऊ दाभाडे, माणिक अवघडे, आनंदी अवघडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, हितचिंतक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पुरस्कारार्थींचा शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी डीपीआयचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे यांना ‘मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठान जीवनगौरव पुरस्कार’, प्रसिद्ध कवी, लेखक व व्याख्याते दंगलकार नितीन सुभाष चंदनशिवे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार’, सेवानिवृत्त राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक शिरीष बाबुराव जंगम यांना ‘महात्मा फुले राज्यस्तरीय उत्कृष्ट अधिकारी व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’, तर प्रा. दीपक सर्जेराव तडाखे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
तसेच मलकापूरचे नगरसेवक भीमाशंकर इराप्पा माहूर यांना ‘महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श उद्योजक पुरस्कार’, एनआयएस राष्ट्रीय कोच व कुस्ती प्रशिक्षक प्रा. पै. अमोल हरिबा साठे यांना ‘राजर्षी शाहू महाराज राज्यस्तरीय आदर्श क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार’, तर ‘चांगभलं’चे संपादक व पत्रकार हैबतराव संपतराव आडके यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार’ तर 'राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार - नितीनभाऊ आवळे यांना आणि
'राज्यस्तरीय लोकसेवा पुरस्कार - जगन्नाथ कुंभार यांना प्रदान करण्यात आला.

 




यावेळी बोलताना प्रा. सुकुमार कांबळे यांनी महापुरुषांच्या विचारांचा केवळ जयजयकार न करता ते आचरणात आणण्याची गरज व्यक्त केली. “महापुरुषांच्या केवळ जयंती करून चालणार नाही, त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत. महात्मा फुले यांनी ‘सगळे अनर्थ अविद्येने’ होत असल्याचे सांगितले होते. मात्र आज महाराष्ट्रातील सुमारे १५ हजार प्राथमिक शाळा बंद झाल्या असून, २० पटसंख्येच्या आतील शाळांचे कारण सांगून वाड्यावस्त्यांवरील, दुर्गम भागातील आणि गोरगरीब कुटुंबांतील सुमारे २० लाख विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचे काम सुरू आहे. याविरोधात आवाज उठविला पाहिजे,” असे ते म्हणाले.
अध्यक्षस्थानावरून शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी शिक्षण व्यवस्थेतील निधीच्या प्रश्नावर भाष्य केले. “महात्मा फुले यांनी त्या काळात ‘इतके अनर्थ अविद्येने केले’ असे सांगितले होते; मात्र आज निधीअभावी अनर्थ घडत आहेत. सरकार शिक्षणावर ८५ हजार कोटी रुपये खर्च होत असल्याचे सांगते; परंतु त्यातील सुमारे ५५ हजार कोटी रुपये केवळ पगारावर खर्च होत असतील तर शाळा सुधारणा, अभ्यासक्रम आणि इतर शैक्षणिक बाबींवर किती खर्च होतो, याचा विचार करण्याची गरज आहे," असे सांगत शिक्षण व्यवस्थेतून केंद्र व राज्य सरकार बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी केली.
अॅड. संभाजीराव मोहिते यांनी महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. “महापुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी केली म्हणजे आपली जबाबदारी संपली, असे मानत असू तर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. स्वातंत्र्याच्या ८० वर्षांनंतरही मूलभूत सुविधांसाठी लोकांना संघर्ष करावा लागत असेल, तर समाज घडविण्यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या महापुरुषांचे विचार आपण विसरत चाललो आहोत का?,” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा ओबीसी विभागाचे नेते भानुदास माळी यांनी महात्मा फुले, सावित्रीमाई फुले आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. “या महापुरुषांचा केंद्र सरकारने भारतरत्न किताब देऊन यथोचित सन्मान करावा,” अशी मागणी त्यांनी केली.


कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय तडाखे यांनी केले. प्रा. दीपक तडाखे यांनी सूत्रसंचालन केले. आसिफ नदाफ यांनी आभार मानले.


➖➖➖➖➖➖➖

#पुरस्कारवितरणसोहळा #Karad #ChangbhalaNews


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या