चांगभलं वृत्तसेवा | मुंबई
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होण्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. अंतिम टप्प्यात कोणत्याही पक्षाने अतिरिक्त उमेदवार उभा न केल्याने स्पर्धा टळली असून सर्व उमेदवारांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार १२ मे रोजी मतदान आणि निकाल अपेक्षित असला तरी प्रत्यक्ष मतदानाची वेळ येणार नसल्याचे दिसत आहे. काही अपक्षांनी अर्ज सादर केले होते, मात्र आवश्यक असलेल्या १० आमदारांच्या सूचक स्वाक्षऱ्या न मिळाल्याने त्यांचे अर्ज छाननीत बाद होण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ६ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. पक्षाकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार तसेच पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
शिवसेना (शिंदे गट) कडून डॉ. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून झिशान सिद्दीकी यांना संधी देण्यात आली असून त्यांनीही आपला अर्ज भरला आहे.
तर महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अंबादास दानवे हे एकमेव उमेदवार म्हणून मैदानात आहेत.
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे. सध्याच्या राजकीय संख्याबळानुसार महायुतीचे सर्व ८ उमेदवार सहज निवडून येण्याची स्थिती आहे, तर महाविकास आघाडीला एक जागा मिळणार आहे.
या निवडणुकीमुळे विधानपरिषदेतील अनेक विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार असून त्यामुळे सभागृहातील राजकीय गणितात बदल होण्याची शक्यता आहे.
३० एप्रिल ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती, तर ४ मेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. १२ मे रोजी निकाल जाहीर होणार असून १३ मेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल. बिनविरोध निवडीमुळे थेट निवडणूक टळली असली तरी विधानपरिषदेत सत्ताधारी महायुतीची ताकद आणखी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#महाराष्ट्रविधानपरिषदनिवडणूक #महाराष्ट्र #निवडणूक
#सातारा #चांगभलंन्यूज #ChangbhalaNews

0 टिप्पण्या