संस्थापकच्या अविनाश मोहितेंचा भोसलेंना सवाल ; सभासदांनाही केला प्रश्न, "कारखाना खाजगी होण्याची वाट पाहायची का?'
हैबत आडके | साखराळे (ईश्वरपूर)
कारखान्याच्या सभासदांनी त्यांच्या उसाच्या टनेज मधून पैसे देऊन उभारलेला कधीकाळी कारखान्याच्याच मालकीचा असलेला 'कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट' आपल्या डोळ्यासमोरच खाजगी झाला, तेंव्हा आपण काय करू शकलो? आता गुंठाभर जमीन नावावर नसलेल्यांना देखील सभासद केले गेले असून, जे कारखान्याचे जुने सभासद आहेत त्यांचे मात्र शेअर ट्रान्सफर केले गेले नाहीत, ही सुरुवात असून पुढे जाऊन आपण सभासदांच्या मालकीचा असलेला आपला सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना सुद्धा खाजगी होण्याची वाट पहायची का? असा थेट सवाल कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेलचे नेते व कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांनी उपस्थित केला.
वाळवा तालुक्यातील साखराळे येथे कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संस्थापक पॅनेलच्या प्रचारार्थ आयोजित गाव भेट दौरा व कोपरा सभेत बोलत होते. दरम्यान, कारखान्यात लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर सभासदांनी माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलला बळ द्यावे, असे आवाहन करत शेतकरी संघटना या निवडणुकीत पूर्ण ताकदीने संस्थापक पॅनेलच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी यावेळी जाहीर केले.
सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अविनाश पाटील होते. यावेळी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष शंकरराव मोहिते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष एकनाथ निकम-पाटील, नितीन खरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
माजी चेअरमन अविनाश मोहिते म्हणाले, कारखान्यात संस्थापक पॅनल सत्तेत असताना ऊस दरापोटी एफआरपी पेक्षा ३४१ कोटी रुपये अतिरिक्त दिले. विरोधकांनी मात्र गेल्या दहा वर्षांत एफआरपीपेक्षा एक रुपयाही जादा दिला नाही. फक्त एफआरपीच दिली. ती तर शेजारच्या सर्वच कारखान्यांनी दिलीय, मग तुमचे कर्तुत्व काय ? मयत सभासदांचे शेअर्स त्यांच्या वारसांच्या नावे ट्रान्सफर केले गेले नाहीत, ज्यांचे केले, त्यांचे तोंड बघूनच केले. ऊस तोडी तोंड बघूनच दिल्या गेल्या. विद्यमान चेअरमन कारखान्यात किती वेळा आले? सभासदांना किती वेळा भेटले? त्यांच्या अडचणी किती वेळा जाणून घेतल्या? ते कारखाना चांगला चालवल्याची बॅनरबाजी करत आहेत, मग कारखान्यावर ९७७ कोटी रुपयांचे कर्ज कसे? असा असा थेट प्रश्न मोहिते यांनी उपस्थित केला.
कारखान्याच्या मालकीचे कृषी महाविद्यालय आणि दीडशे एकर जमीन एका खाजगी ट्रस्टला हस्तांतर करण्याचा डाव आम्ही पाठीमागे हाणून पाडला. त्यासाठी सभासदांच्या पाठबळामुळे लढा दिला. मात्र पूर्वी सभासदांच्या मालकीचा असलेला कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट जसा खाजगी झाला, तसाच आपला साखर कारखानाही खाजगी होण्याची वाट आपण पाहायची का? असा सवाल मोहिते यांनी उपस्थित केला. माझ्या अपंगत्वाची थट्टा करण्यापलीकडे, कटकारस्थान करून मला अडकवण्यात आलेल्या प्रकरणाचे पुन्हा पुन्हा भांडवल करण्यापलीकडे विरोधकांकडे बोलण्यासारखे आणि सांगण्यासारखे काहीही नाही. या निवडणुकीत सभासदांनी संस्थापक पॅनेलला संधी दिली तर आम्ही १२० किलो विनामूल्य साखर आणि एकरी ७५०० रुपये पाणीपट्टी करणार आहोत, एफआरपी पेक्षा जादा दर देणार आहोत. आणि या घोषणा अभ्यासपूर्वक करत आहोत. सामान्य सभासद आमच्या सोबत आहेत, त्यामुळे ही लढाई आम्ही जिंकू, असा विश्वासही मोहिते यांनी व्यक्त केला.
रघुनाथदादा म्हणाले, अविनाश मोहिते यांनी लढवलेल्या कारखान्याच्या पहिल्या निवडणुकीपासून ते आत्तापर्यंत शेतकरी संघटनेने त्यांनाच पाठिंबा दिला आहे. ते सत्तेत असले तरी आणि विरोधकात असले तरीही आमच्या संघटनेचा पाठिंबा त्यांनाच राहिला आहे. पाणीपट्टी ही टनावर कपात न करता, ती पैशांच्या स्वरूपात व एकरी कपात करावी, अशी शेतकरी संघटनेची पूर्वीपासून मागणी आहे, तसे आश्वासन अविनाश मोहिते यांनी दिले आहे. त्यांनी केलेल्या घोषणा शेतकरी हिताच्या आहेत. याउलट सत्ताधाऱ्यांची कारखान्यातील हुकूमशाही वाढलेली आहे. त्यामुळे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सभासदांनी संस्थापक पॅनेलला सहकार्य करून अविनाश मोहिते यांना पाठबळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रास्ताविकात बालाजी जगताप यांनी, अविनाश मोहिते यांच्या कार्यकाळातील १२.६० लाख टन ऊस गाळपाच्या विक्रमाचा उल्लेख केला. गजानन पाटील यांनी संस्थापक पॅनेलच्या कारभाराचा आढावा घेत विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले.
यावेळी अतुल पाटील, महादेव पवार, शंकरराव मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व स्वागत एकनाथ निकम-पाटील यांनी, तर आभार विकास सुतार यांनी मानले. सभेला विठ्ठल नाईक, सयाजी पाटील, सुभाष पाटील यांच्यासह साखराळे व परिसरातील शेतकरी सभासद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#कृष्णाकारखानानिवडणूक #साखराळे #संस्थापकपॅनेल
#अविनाशमोहिते #कृष्णाकारखाना #चांगभलंन्यूज
#साप्ताहिकचांगभलं #चांगभलंसाप्ताहिक #चांगभलं

0 टिप्पण्या