चांगभलं प्रतिनिधी | कराड
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कराड तालुक्यातील मसूर बस स्थानक परिसरात शासननिर्देशित २०० मीटर नो-पार्किंग झोनची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विशेष पाहणी व जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यावरही भर देण्यात आला.
आगार व्यवस्थापक श्रीमती शर्मिष्ठा पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या या मोहिमेत वाहतूक शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बस स्थानक परिसराची सखोल पाहणी केली. परिसरात नियमबाह्य वाहन पार्किंग रोखणे, वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे या उद्देशाने ही मोहीम आयोजित करण्यात आली होती.
मोहिमीदरम्यान आगार व्यवस्थापक श्रीमती शर्मिष्ठा पोळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शासन नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले. तसेच अवैध प्रवासी वाहतुकी करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
या वेळी उपस्थित प्रमुख अधिकारी:
- श्री नितीशकुमार पवार – वाहतूक निरीक्षक
- श्री आशुतोष चव्हाण – वाहतूक निरीक्षक (वाहतूक शाखा)
- श्रीमती श्वेता गायकवाड – राखण व पहारा निरीक्षक (सुरक्षा व दक्षता शाखा)
या अधिकाऱ्यांनी वाहनचालक व स्थानिक नागरिकांना नो-पार्किंग झोनमध्ये वाहने उभी न करण्याचे आवाहन केले. तसेच अवैध प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन न देण्याची विनंतीही केली.
मसूर बस स्थानक परिसरात शिस्तबद्ध, सुरक्षित आणि सुव्यवस्थित वाहतूक व्यवस्था कायम ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या जनजागृती व पाहणी मोहिमांचे आयोजन नियमितपणे करण्यात येणार असल्याची माहिती एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#लालपरी #एसटीबस #मसूर #कराड #चांगभलं #चांगभलंन्यूज
#साप्ताहिकचांगभलं #चांगभलंसाप्ताहिक #ChangbhalaNews

0 टिप्पण्या