'कृष्णा'तील ११ वर्षांच्या कामगिरीवर विश्वास, विकासाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय पाठिंबा मिळाल्याचा दावा ; सभासदांना बहुमताचे आवाहन
हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी, कराड
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या २०२६ च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ वडगाव हवेली (ता. कराड) येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य आणि निवडणूक प्रचाराचा प्रारंभ अशा दुहेरी पार्श्वभूमीवर झालेल्या या सभेत कारखान्यातील गेल्या अकरा वर्षांतील विकासकामांचा सविस्तर आढावा, पुढील पाच वर्षांचा विकास आराखडा मांडताना विरोधकांच्या कारभारावर टीकेची झोड उठविली गेली.
सभेच्या अध्यक्षस्थानी वडगाव हवेलीचे माजी सरपंच सत्यवान जगताप होते. यावेळी ज्येष्ठ नेते तथा कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, उपाध्यक्ष जगदीश जगताप, प्रा. धनाजी काटकर, दयानंद पाटील, मनोहर शिंदे, तेजस सोनवणे, संचालक मंडळातील सदस्य, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोकराव जगताप यांनी केले.
कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी २०१५ मधील परिस्थितीची आठवण करून देताना सांगितले की, २००६-०७ मध्ये आमचे मनोमिलन झाले आणि सहकारातील संघर्ष टाळण्यासाठी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र २०१० नंतर कारखान्याचा कारभार बिघडत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या. व्यापाऱ्यांची देणी, तोडणी-वाहतूकदारांचे थकीत पैसे, पर्यावरण विभागामुळे बंद पडलेली डिस्टिलरी, विविध संस्थांवरील निर्बंध आणि आर्थिक अनिश्चितता अशा परिस्थितीत २०१५ मध्ये कारखान्याची धुरा हाती घ्यावी लागली.
ते म्हणाले, ज्या अविनाश मोहितेंना साध्या सोसायटीच्या सदस्य पदाचा अनुभव नाही अशा माणसाला एवढी मोठी सहकारी संस्था कशी चालवता येणार? आणि त्याचमुळे खरंतर कारखाना त्यांच्या काळात अडचणीत आला, त्यांना कारखानदारी मधले काहीच कळत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली.
त्यांनी व्यापारी कर्ज १५ कोटी करून ठेवले, कारखान्याची वीज, पाणी कट करण्यात आले होते, तोडणी वाहतुकीला पैसेच शिल्लक नव्हते, अग्रीकल्चर कॉलेज, डिटस्लरी बंद केली होती, तोडणी कामगारांना पैसे दिले नाहीत म्हणून त्या कामगारांनी संप केला होता,
तसेच १००० कामगार महिना ५ हजार रुपये पगाराने कारखान्यात कामाला असल्याचे दाखवून महिन्याला ५० लाख रुपये त्यांच्या पगारापोटी खर्च केले. मात्र हे कामगार आजअखेर कागदावर कुठेच दिसत नाहीत. मग हे प्रत्येक महिन्याला ५० लाख रुपये गेले कुठे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अविनाश मोहितेंच्या काळात अतिशय बिकट परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीत हा कारखाना आपण ताब्यात घेतला, आज अथक प्रयत्नाने हा कारखाना राज्यात अव्वल दर्जाचा म्हणून सध्या डौलाने उभा आहे, सुस्थितीत आणला आहे. पण अविनाश मोहितें सारखी प्रवृत्ती फोफावली असती तर कारखाना विकावा लागला असता, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, पहिल्या टप्प्यात कारखान्याला स्थैर्य देण्याचे आणि त्यानंतर विस्ताराचे धोरण राबविण्यात आले. गाळप क्षमता वाढविणे, इथेनॉल प्रकल्प उभारणे, डिस्टिलरीचे संपूर्ण आधुनिकीकरण, बायोगॅस प्रकल्प सक्षम करणे आणि साखर उताऱ्यात वाढ करणे या माध्यमातून कारखान्याची आर्थिक ताकद वाढविण्यात आली. आज कारखान्याची ऑफ सीझन दुरुस्तीची कामे ऑक्टोबरऐवजी जूनमध्ये पूर्ण होण्याइतकी कार्यक्षमता निर्माण झाली आहे, असा दावा त्यांनी केला.
पुढील काळात सिंचन योजनांचे आधुनिकीकरण, जुन्या मोटारी व पंप बदलणे, ड्रिप सिंचनाचा विस्तार, क्षारपड जमिनींचे पुनर्वसन, पाणंद रस्त्यांची उभारणी आणि शासनाच्या मदतीने सहकारी पाणीपुरवठा योजनांचे नूतनीकरण या कामांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सहकार क्षेत्र राजकारणमुक्त राहावे, या भूमिकेचा पुनरुच्चार करत त्यांनी सांगितले की, विकासाच्या मुद्द्यावर विविध पक्षांतील नेते एकत्र आले आहेत. विश्वजीत कदम, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, उदयसिंह पाटील यांच्यासह विविध नेत्यांनी कारखान्याच्या विकासाला पाठिंबा दिला आहे. सभासद सुज्ञ असून ते विकासाच्या बाजूने निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी विरोधकांच्या कारभारावर जोरदार टीका करताना सांगितले की, २०१५ मध्ये डॉ. सुरेशबाबा यांनी कारखान्याची सूत्रे स्वीकारताना आर्थिक परिस्थिती गंभीर होती. व्यापारी देणी, तोडणी-वाहतूक व्यवस्थेतील गोंधळ आणि आर्थिक अनागोंदी यामुळे कारखाना अडचणीत आला होता. मात्र पारदर्शक आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे कारखान्याला पुन्हा उभारी देण्यात यश आले.
गेल्या अकरा वर्षांत कारखान्याची गाळप क्षमता ७,२०० टीसीडीवरून १२ हजार टीसीडीपर्यंत वाढविण्यात आली. यावर्षी १४ लाख १९ हजार टनांहून अधिक ऊस गाळप करून केवळ १०७ दिवसांत हंगाम पूर्ण करण्यात आला. कारखान्याचा सरासरी साखर उतारा १२.४८ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून सलग तीन हंगाम १२.७० टक्क्यांपेक्षा जास्त उतारा मिळाला आहे. जिल्ह्यात सर्वप्रथम ३,५०० रुपयांचा पहिला ऊसदर हप्ता देण्याचा मान कृष्णा कारखान्याला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
सभासदांना ६० किलो नि:शुल्क साखर देण्याच्या योजनेचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, गेल्या ११ वर्षांत या योजनेसाठी तब्बल ७८ कोटी रुपये खर्च करण्यात आले. गावागावांत साखर पोहोचवून सभासदांना दिलासा देण्यात आला.
विरोधकांच्या पाच वर्षांच्या कारभारात हुतात्मा कारखान्यापेक्षा तब्बल ३०० रुपये प्रतिटन कमी ऊसदर देण्यात आला होता, असा आरोप त्यांनी केला. विरोधकांच्या काळात २,५७६ तोडणी-वाहतूक वाहनांशी करार केले गेले. त्यापैकी सुमारे १,१०० वाहने प्रत्यक्षात आलीच नाहीत, त्यामुळे मोठी आर्थिक देणी निर्माण झाली. त्या काळातील ५८ कोटी रुपयांची थकबाकी पुढे शंभर कोटींच्या घरात गेली, असा दावा त्यांनी केला.
सहकारी पाणीपुरवठा योजनांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या ‘एआयबीपी’ (Accelerated Irrigation Benefit Programme) योजनेअंतर्गत निधी मिळविण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. सहकारी योजनांना वीजबिल सवलत, मोटारींचे आधुनिकीकरण आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सहकार्याने त्रिपक्षीय कराराच्या माध्यमातून योजनांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांकडून होणाऱ्या अंधश्रद्धापूर्ण प्रचारावर टीका करताना त्यांनी, “लिंबू, भंडारा किंवा टाचण्या टाकून निवडणुका जिंकता येत नाहीत; जनतेचा विश्वास आणि विकासकामेच विजय मिळवून देतात,” असा टोला लगावला.
उपाध्यक्ष जगदीश जगताप यांनी स्व. जयवंतराव भोसले यांनी उभ्या केलेल्या सहकार, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील संस्थांचा गौरवपूर्ण इतिहास मांडला. डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा परिवाराने विकासाचा वेग कायम राखला असून, कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आज अनेक शेतकरी एकरी १०० ते १२० टनांपर्यंत ऊस उत्पादन घेत आहेत. पुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या मदतीने हे उत्पादन १५० ते २०० टनांपर्यंत नेण्याचे स्वप्न कृष्णा परिवाराने पाहिले असल्याचे त्यांनी नमूद केले.
राजकीय मतभेद बाजूला ठेवून विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त करत त्यांनी सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.
रयत संघटनेचे नेते प्रा. धनाजी काटकर यांनी स्व. जयवंतराव भोसले यांच्या सहकार चळवळीतील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. कृष्णा उद्योग समूह, कृष्णा हॉस्पिटल, वैद्यकीय शिक्षण संस्था, साखर कारखाना आणि विविध सामाजिक संस्थांच्या उभारणीत शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचे हित केंद्रस्थानी ठेवले गेले, असे त्यांनी सांगितले.
२०१५ मध्ये कारखान्याची स्थिती चिंताजनक असल्याने डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. आजही विकासकामांच्या आधारावरच हा पाठिंबा कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षीय राजकारण वेगळे असले तरी सहकार संस्थांचे हित सर्वोच्च मानले पाहिजे, असे सांगत त्यांनी सभासदांनी मोठ्या मताधिक्याने जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला विजयी करावे, असे आवाहन केले.
कारखान्याची कामगिरी आणि विस्तार...
गेल्या अकरा वर्षांत कारखान्याची गाळप क्षमता ७,२०० टीसीडीवरून १२ हजार टीसीडीपर्यंत वाढविण्यात आली. इथेनॉल प्रकल्पाचा विस्तार, डिस्टिलरीचे नूतनीकरण, बायोगॅस प्रकल्पाची उभारणी आणि साखर उताऱ्यातील वाढ यामुळे कारखान्याच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली. आज कारखाना दररोज दीड लाख लिटर इथेनॉल उत्पादन करण्याच्या क्षमतेपर्यंत पोहोचल्याचा दावा सहकार पॅनेलच्या नेते मंडळींकडून सभेत करण्यात आला.
पाणीपुरवठा योजनांचे आधुनिकीकरण पुढील लक्ष्य...
कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अनेक सहकारी पाणीपुरवठा योजना ४० ते ५० वर्षे जुन्या झाल्या आहेत. वाढता वीज खर्च, जुन्या मोटारी आणि वितरण व्यवस्थेतील अडचणी लक्षात घेऊन शासनाच्या मदतीने या योजनांचे आधुनिकीकरण, ड्रिप सिंचनाचा विस्तार, नवीन मोटारी व पंप बसविणे आणि खर्च कमी करणे या दिशेने प्रयत्न सुरू असल्याची माहिती डॉ. भोसले यांनी सभेत दिली.
विकासाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय एकजूट...
सहकार क्षेत्रातील विकासाला प्राधान्य देत विविध राजकीय पक्षांतील नेत्यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून कृष्णा परिवाराला पाठिंबा दिल्याचा उल्लेख सभेत विविध वक्त्यांकडून करण्यात आला. सहकार आणि राजकारण वेगळे ठेवून विकासासाठी एकत्र येण्याची भूमिका मांडत, सभासदांनी विकासाच्या बाजूने कौल द्यावा, असे आवाहन करण्यात आले. जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला मागील निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#कृष्णाकारखानानिवडणूक२०२६ #सहकारपॅनेल
#डाॅसुरेशभोसले #अतुलबाबाभोसले #कृष्णाकारखाना
#वडगावहवेलीसभा #साप्ताहिकचांगभलं #चांगभलं
#चांगभलंन्यूज #चांगभलंसाप्ताहिक #ChangbhalaNews









0 टिप्पण्या