कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
आगामी पंधरावे विद्रोही साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कराड येथे तालुकास्तरीय नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक शुक्रवार (दि. ६ मार्च) रोजी दुपारी ४ वाजता कराड येथील ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था, सौ. वेणूताई चव्हाण रुग्णालयासमोर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.
या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर उपस्थित राहणार आहेत. तसेच कॉ. धनाजी गुरव, विजय मांडके, अॅड. रवींद्र पवार, अॅड. राजेंद्र गलांडे, प्राचार्य डॉ. सतीश घाडगे आणि प्रा. डॉ. विजय माने हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
बैठकीच्या आयोजनात अॅड. समीर देसाई, प्रा. डॉ. शंकर पवार, आनंदराव लादे आणि आनंदा थोरात यांचा पुढाकार आहे. समाजात समता, बंधुता आणि प्रगतिशील विचार दृढ करण्याच्या उद्देशाने विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत असून त्याच्या पूर्वतयारीसाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा टिकवून ठेवण्यासाठी तसेच समाजात वाढत असलेल्या द्वेषाच्या वातावरणाविरोधात साहित्याच्या माध्यमातून जनजागृती घडवून आणणे आवश्यक असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे.
या पार्श्वभूमीवर साहित्यप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि पुरोगामी विचारांचे नागरिक यांनी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या लोकचळवळीला बळ द्यावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष अॅड. भाई समीर देसाई यांनी केले आहे.

0 टिप्पण्या