कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कराड दक्षिणच्या डोंगरी भागातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाय ठरणाऱ्या येवती उपसा सिंचन योजनेसह गुढे-पाचगणी योजनेला तातडीने तांत्रिक मंजुरी व निधी उपलब्ध करून द्यावा, अन्यथा ३० एप्रिल रोजी वारणा धरणापासून कोल्हापूर येथील कृष्णा खोरे कार्यालयावर १०५ गावांतील शेतकरी लाँग मार्च काढतील, असा खणखणीत इशारा श्रमिक मुक्ती दल व पाणी संघर्ष चळवळीचे ज्येष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.
मानेवाडी येथे कराड दक्षिण, शिराळा व पाटण तालुक्यातील डोंगरी व पाण्याअभावी वंचित राहिलेल्या गावांच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी सभापती हणमंतराव पाटील, तानाजी पाटील, वसंत पाटील, शंकर मोहिते, शिवाजी पाटील, बाळासाहेब माने, उदय पाटील, संदीप पाटील, सचिन मोरे, सखाराम पाटील, बाबासाहेब पवार आदी उपस्थित होते.
डॉ. पाटणकर म्हणाले, कराड दक्षिणच्या डोंगरी पट्ट्यातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर येवती उपसा सिंचन योजना ही या भागासाठी जीवनरेखा ठरणार आहे. वारणा खोऱ्यातील पाणी उचलून डोंगरी भागात पोहोचविण्याची ही योजना पूर्ण झाल्यास शेतीला नवे बळ मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल.
या योजनेसाठी मंत्रालय, पुणे, कोल्हापूर व कृष्णा खोरे कार्यालयात अनेक बैठका, आंदोलने व सातत्यपूर्ण पाठपुरावा करून कामे मार्गी लावली आहेत. मात्र, आता तांत्रिक मंजुरी व निधीबाबत शासनाची अधिकृत लेखी हमी आवश्यक आहे. केवळ आश्वासनावर विश्वास ठेवता येणार नाही. त्यामुळे २९ एप्रिलपर्यंत अधिकृत पत्र न मिळाल्यास ३० एप्रिल रोजी वारणा धरणापासून कोल्हापूर येथील कृष्णा खोरे कार्यालयावर १०५ गावांतील शेतकरी लाँग मार्च काढतील व तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, कराड दक्षिणच्या डोंगरी भागातील शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी येवती उपसा जलसिंचन योजना ही योजना निर्णायक ठरणार असून, यासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून गेले अनेक महिने लढा व्यापक केला जात आहे. त्याअंतर्गत जनजागृती, विचारविनिमय बैठका, निवेदने, मागण्या व पाठपुरावा शासनाकडे तसेच संबंधित विभागांच्याकडे सुरू आहे. डॉ. पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या लढ्यामुळे पाण्यापासून वंचित असलेल्या भागातील शेतकऱ्यांची एकजूट अधिक तीव्र होत आहे. त्यामुळे २९ एप्रिल पर्यंत राज्य शासनाकडून याबाबत कोणते ठोस निर्णय घेतले जातात याकडे तीन तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. संघर्ष टाळण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#कराडदक्षिण #येवतीयोजना #भारतपाटणकर #मानेवाडी
#नदीजोडप्रकल्प #पाणीसंघर्ष #चांगभलंन्यूज
#ChangbhalaNews

0 टिप्पण्या