हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी, कराड
रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया सोमवारी पार पडली. या प्रक्रियेत विविध कारणांमुळे ७ अर्ज नामंजूर ठरविण्यात आले असून, अखेर १२२ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सकाळी ११ वाजल्यापासून छाननी प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला राखीव प्रवर्गातील अर्जांची, त्यानंतर इतर सर्व गटांतील अर्जांची पडताळणी करण्यात आली. छाननीदरम्यान कारखान्याची थकबाकी, सूचकांची अपात्रता तसेच दोनपेक्षा अधिक अपत्यांचा नियम अशा कारणांवरून काही उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले.
महिला राखीव आणि गट क्रमांक २ मधील उमा अजितकुमार देसाई यांचे अर्ज कराड अर्बन बँकेची थकबाकी असल्याच्या कारणावरून नामंजूर करण्यात आले. गट क्रमांक ४ मधील महेश राजाराम पवार यांचा अर्ज सूचक थकबाकीदार असल्याने बाद झाला. गट क्रमांक ३ मधील अविनाश किसन पाटील यांचे दोन अर्ज दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्याच्या कारणावरून फेटाळण्यात आले. गट क्रमांक ५ मधील राजेंद्र शंकरराव पाटील यांचा अर्ज सूचक कारखान्याचा थकबाकीदार असल्याने नामंजूर करण्यात आला. तसेच अनुसूचित जाती-जमाती राखीव प्रवर्गातील विजय जयसिंग बल्लाळ यांचा अर्ज उमेदवार थकबाकीदार असल्याने बाद करण्यात आला.
या निवडणुकीसाठी एकूण १३९ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. त्यापैकी १० अर्ज दुबार आढळून आले, तर ७ अर्ज छाननीत बाद झाले. त्यामुळे अंतिमतः १२२ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मंगळवारी वैध उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. दरम्यान, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत ९ जूनपर्यंत ठेवण्यात आली असून, दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत सूचक अर्ज माघारी घेऊ शकणार आहेत. सूचकांमार्फत अर्ज मागे घेताना उमेदवाराचे प्राधिकृत पत्र सादर करणे बंधनकारक राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#कृष्णाकारखानानिवडणूक #कृष्णानिवडणूक #रेठरेबुद्रुक
#साप्ताहिकचांगभलं #चांगभलंसाप्ताहिक #चांगभलं
#चांगभलंन्यूज #ChangbhalaNews

0 टिप्पण्या