🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

‘दगडापेक्षा वीट मऊ’ म्हणत अखेर डाॅ. इंद्रजीत मोहितेंचा भोसलेंच्या सहकार पॅनलला पाठिंबा!

 


“मोहिते म्हणाले..."कारखाना वाचला पाहिजे म्हणून 'सहकार'ला साथ; पण अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर भविष्यात निवडणुकीत उतरू”


हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी, कराड


यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत रयत संघर्ष मंचाने अखेर आपली भूमिका स्पष्ट करत सहकार पॅनेलला पाठिंबा जाहीर केला आहे. “संघर्षासाठी संघर्ष करून कारखाना कमकुवत करण्यापेक्षा, सध्याच्या परिस्थितीत ‘दगडापेक्षा वीट मऊ’ या भूमिकेतून सहकार पॅनेलला साथ देत आहोत,” असे सांगत डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी यावेळच्या निवडणुकीत डॉ . सुरेशबाबा भोसले यांच्या सहकार पॅनेल सोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र हा पाठिंबा अटींसह असल्याचे स्पष्ट करत, सभासदांचे हित डावलले गेले तर भविष्यात पुन्हा निवडणुकीच्या संघर्षात उतरू, असा इशाराही त्यांनी दिला.
य. मो. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत माजी चेअरमन डॉ. मोहिते यांनी कारखान्याच्या सध्याच्या स्थितीपासून सहकार चळवळीतील बदलांपर्यंत अनेक मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली. “कारखाना कोणत्याही एका कुटुंबाचा किंवा गटाचा नाही; तो सभासदांचा आहे. त्यामुळे कारखाना टिकवणे आणि सहकाराची परंपरा जपणे हीच खरी जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.
गेल्या काही वर्षांत सहकारी साखर कारखान्यांसमोरील आर्थिक आणि औद्योगिक आव्हाने वाढल्याचे सांगत त्यांनी, “आज कारखाना चालवणे ही पूर्वीसारखी सोपी गोष्ट राहिलेली नाही. वाढती स्पर्धा, आर्थिक ताण आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे सहकार क्षेत्र अडचणीत आले आहे. अशा वेळी केवळ राजकीय भूमिका घेण्यासाठी संघर्ष करणे योग्य नाही,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
रयत संघर्ष मंचाने गेली अनेक वर्षे सभासदांच्या प्रश्नांवर आवाज उठवला असून, कारखान्यात संधी मिळाल्यानंतर अनेक निर्णय सभासदांच्या फायद्यासाठी घेतल्याचे त्यांनी सांगितले. “सत्तेत असणारा प्रत्येकजण परिपूर्ण असतोच असे नाही. आमच्याकडूनही काही निर्णयांमध्ये त्रुटी राहिल्या असतील; मात्र त्या चुका मान्य करून पुढे जाण्याची गरज आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कारखान्यातील अनेक मूलभूत प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचे सांगताना त्यांनी सुमारे ९ हजार सभासदांचे शेअर ट्रान्सफर रखडल्याचा मुद्दा उपस्थित केला. “सभासदांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणे ही गंभीर बाब आहे. हे प्रश्न लवकर सोडवले गेले पाहिजेत,” असेही त्यांनी नमूद केले.
संस्थापक आणि सहकार पॅनेल यांच्यातील लढतीत दोन्ही बाजूंचा अभ्यास करूनच सहकार पॅनेलला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. “सहकार पॅनेलकडे कारखाना टिकवण्याची क्षमता आणि व्यवस्थापनाची दृष्टी दिसते. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत उभे राहत आहोत; मात्र आम्ही कोणाच्याही आंधळ्या समर्थनासाठी मैदानात उतरत नाही,” असेही माजी चेअरमन डॉ. मोहिते यांनी स्पष्ट केले.


“सहकाराच्या नावावर सत्ता नव्हे, सभासदांचा विचार हवा”
सहकारात राजकीय वर्चस्वासाठी स्पर्धा वाढत असून, मूळ सभासदांचा आवाज मागे पडत असल्याची खंत डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी व्यक्त केली. “यशवंतराव मोहिते यांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सहकार उभा केला होता. मात्र आज सहकार संस्थांकडे सत्तेचे केंद्र म्हणून पाहिले जात आहे. सभासदांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवूनच कारखान्याचा कारभार झाला पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.


“कृष्णाशी निगडित संस्था पुन्हा सक्षम होण्याची गरज”
कृष्णा कारखान्याभोवती उभ्या राहिलेल्या अनेक संस्था सध्या आर्थिक आणि प्रशासकीय अडचणीत असल्याचे सांगत डॉ. मोहिते यांनी त्यांना नवसंजीवनी देण्याची गरज व्यक्त केली. “कृषी उद्योग संघ, यशवंतराव मोहिते नागरी पतसंस्था यांसारख्या संस्था सक्षम झाल्या, तर रोजगारनिर्मितीला चालना मिळेल आणि ठेवीदारांचाही विश्वास वाढेल. कारखाना आणि संलग्न संस्था मजबूत होणे हेच सहकार चळवळीच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#इंद्रजीतमोहिते #रयतपॅनेल #सहकारपॅनेल #कृष्णाकारखाना

#कृष्णाकारखानानिवडणूक #साप्ताहिकचांगभलं #चांगभलं 

#चांगभलंसाप्ताहिक #ChangbhalaNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या