हैबत आडके | चांगभलं वृत्तसेवा, कराड
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील राजकारणाने अनपेक्षित कलाटणी घेतली आहे. अनेक वर्षे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले डॉ. सुरेश भोसले आणि ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे दोन प्रभावी गट आता एकाच मंचावर दिसू लागल्याने सहकारातील सत्तासंघर्ष नव्या टप्प्यावर पोहोचला आहे. कोयना दूध संघावर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात रयत संघटनेने जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला दिलेला उघड पाठिंबा हा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून कराडच्या आगामी राजकारणाची दिशा ठरवणारा राजकीय संदेश मानला जात आहे.
'भोसले-उंडाळकर' या एका घोषणेमुळे तालुक्यातील पारंपरिक राजकीय रेषा धुसर झाल्या आहेत. विशेष म्हणजे, २०२१ मध्ये संस्थापक पॅनेलच्या बाजूने उभे राहिलेले उंडाळकर आता थेट भोसले गटासोबत गेल्याने अविनाश मोहिते यांच्या राजकीय रणनीतीसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सहकाराच्या नावाखाली सुरू झालेली ही जवळीक प्रत्यक्षात भविष्यातील जिल्हा बँक, बाजार समिती, सहकारी सोसायटी व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची पायाभरणी असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसू लागले आहे. ही नवी आघाडी विधानसभेपर्यंत टिकून राहिली तर अनेक राग'रंग' बघायला मिळू शकतात.
सहकाराच्या नावाखाली राजकीय पुनर्मांडणी?
कोयना दूध संघावरील मेळाव्यात डॉ. सुरेश भोसले यांनी स्व. जयवंतराव भोसले आणि स्व. विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या सलोख्याच्या राजकारणाचा उल्लेख करत सहकाराची परंपरा पुढे नेण्याचा संदेश दिला आहे. “सहकार हा संघर्षाचा विषय नाही; तो विकासाचा मार्ग आहे,” असे सांगत त्यांनी कृष्णा आणि रयत या दोन्ही सहकारी संस्थांनी एकत्रितपणे शेतकरीहितासाठी काम करण्याची भूमिका मांडली.
मात्र राजकीय वर्तुळात या विधानांचा अर्थ वेगळ्याच पद्धतीने घेतला जात आहे. कारण त्याच मंचावर डॉ. भोसले यांनी “उदयसिंह पाटील-उंडाळकर हे निश्चित जिल्हा बँकेत जातील,” असे जाहीरपणे सांगितले. त्यामुळे ही हातमिळवणी केवळ सहकारासाठी नसून आगामी सत्ताकारणाची गुंतवणूक असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
दुसरीकडे उदयसिंह पाटील-उंडाळकरांनीही या मेळाव्यात कार्यकर्त्यांसमोर “आजचा प्रश्न हा अस्तित्वाचा आणि रोजीरोटीचा आहे,” असे सांगत सहकार पॅनेलच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहण्याची घोषणा केली. या वक्तव्याने रयत संघटनेचा निर्णय हा केवळ भावनिक किंवा तात्पुरता नसून ठोस राजकीय गणितातून घेतला गेला असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
मोहिते-भोसले संघर्षाचा उंडाळकरांना फायदा ; आता समीकरणांची उलथापालथ...
कराड दक्षिणचे राजकारण म्हणजे मोहिते, भोसले आणि उंडाळकर या तीन शक्तिकेंद्रांभोवती फिरणारे राजकारण. १९८९ नंतर कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत मोहिते आणि भोसले गट आमनेसामने उभे ठाकले आणि त्यातून सुरू झालेला संघर्ष अनेक दशकं कायम राहिला. उंडाळकर गटाने या काळात वेळेनुसार भूमिका घेत कधी मोहितेंना तर कधी भोसलेंना साथ देत अनेक दशकं स्वतःची राजकीय ताकद टिकवून ठेवली.
२०११ मध्ये स्वर्गीय विलासराव पाटील - उंडाळकरांनी आबासाहेब मोहिते यांचे नातू अविनाश मोहिते यांच्या पाठीशी उभे राहत त्यांना कृष्णा कारखान्याच्या सत्तेपर्यंत पोहोचवण्यात निर्णायक भूमिका बजावली. मात्र २०१५ नंतर दोन्ही गटांमधील राजकीय विश्वास कमी होत गेला आणि त्याच काळात डॉ. सुरेश भोसले यांचे सहकार पॅनेल कारखान्यावर स्थिरावले.
२०२१ मध्ये रयत पॅनेल आणि संस्थापक पॅनेल स्वतंत्र लढल्याने भोसले गटाला थेट फायदा झाला. निवडणुकीत दोन्ही विरोधी गटांचा मोठ्या फरकाने पराभव झाला आणि याच निकालाने पुढील राजकीय समीकरणांची बीजे रोवली गेली.
उंडाळकरांच्या बदलत्या भूमिकेमागे नाराजीचा प्रवाह...
राजकीय विश्लेषकांच्या मते, जिल्हा बँक निवडणुकीपासून उदयसिंह पाटील-उंडाळकर आणि अविनाश मोहिते यांच्या गटातील अंतर वाढू लागले. जिल्हा बँकेतील पराभवानंतर उंडाळकर गटातून “अविनाश मोहिते यांच्या गटाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही” हा सूर सातत्याने उमटत राहिला. त्यानंतर बाजार समिती आणि आता नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही हे अंतर स्पष्टपणे दिसून आले.
विधानसभा निवडणुकीत कराड उत्तर मध्ये उंडाळकर गटाने भाजपचे मनोज घोरपडे यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील गटाला जोराचा धक्का दिला. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही उंडाळकर गटाने आमदार घोरपडे यांना साथ दिली. याउलट कराड दक्षिण मध्ये उंडाळकर गटाने आमदार अतुल भोसले यांच्या गटाबरोबर कडवा संघर्ष केला. मात्र या संघर्षामध्ये अविनाश मोहिते यांच्या गटाकडून अपेक्षित साथ मिळाली नसल्याचा मुद्दा वारंवार चर्चेत राहिला. त्यामुळे उंडाळकर गटाची अविनाश मोहिते गटासोबतची पूर्वीची जवळीक हळूहळू संपुष्टात येत गेली.
त्यातूनच आता भोसले-उंडाळकर समीकरण आकाराला आले. म्हणून हे अचानक घडलेले नसून गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात तयार होत असलेल्या राजकीय प्रक्रियेचा हा परिपाक असल्याचे मानले जात आहे.
मोहिते गटासमोर नवे आव्हान...
या नव्या समीकरणामुळे कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत संस्थापक पॅनेलसमोर मोठं आव्हान निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण कराड दक्षिणमध्ये उंडाळकर गटाचा प्रभाव हा केवळ मतदानापुरता मर्यादित नसून सहकारी संस्था, बाजार समिती आणि गावपातळीवरील संघटनांमध्येही त्यांची मजबूत पकड मानली जाते.
उंडाळकर गटाने भोसले गटासोबत हातमिळवणी केल्याने विशेषता कराड दक्षिण मध्ये, अविनाश मोहिते गटाची पारंपरिक मतांची साखळी विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र हा निर्णय भोसले आणि उंडाळकर या दोन्ही गटाच्या तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या लगेच पचनी पडेल, असे म्हणणेही धाडसाचे ठरणार आहे. कारण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकानंतर एकमेकांच्या विरोधात लढलेले दोन गट तालुक्यात लगेचच पुन्हा एकत्र येत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्यात एकत्रीकरण होणे तितकेच महत्त्वाचे ठरणारे आहे. त्यातूनही हे समीकरण भक्कमपणे समोर येऊ लागले तर या समीकरणाला थोपविण्यासाठी कारखान्याच्या या निवडणुकीत अविनाश मोहिते यांचा गट कोणती रणनीती आखणार आणि कोणत्या नव्या राजकीय मित्रांचा शोध घेणार, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.
कृष्णा कारखाना की भविष्यातील सत्ता केंद्रे?...
कृष्णा कारखान्याची निवडणूक ही आता केवळ एका सहकारी संस्थेपुरती मर्यादित राहिलेली नाही, हे निश्चित झाले आहे. या निवडणुकीतूनच आगामी जिल्हा बँक, बाजार समिती, गावोगावच्या सहकारी सोसायट्या आणि ग्रामपंचायतींच्या सत्तेचा पाया रचला जाणार आहे. त्यामुळे भोसले-उंडाळकर युती ही तात्पुरती निवडणूक आघाडी आहे की कराडच्या राजकारणातील दीर्घकालीन पुनर्मांडणी? या निवडणुकीपुरता या आघाडीचा परिणाम राहील की भविष्यातील तालुक्याच्या राजकारणाची उलथापालथ घडेल ? आघाडीचा नेमका फायदा कोणत्या गटाला होईल? नुकसान झालेच तर कोणत्या गटाचे होऊ शकेल? या प्रश्नांची उत्तरे काळाच्या पोटात दडली आहेत. मात्र त्याची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला लागली आहे.
सध्या तरी राजकीय वैमनस्य असलेल्या उंडाळकर यांच्याशी थेट हात मिळवणी करून भोसलेंच्या सहकार पॅनेलने कृष्णाच्या निवडणुकीत एक पाऊल पुढे टाकले आहे, त्याला रोखण्यासाठी अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल कोणती आणि कशी रणनीती राबवणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#कृष्णाकारखानानिवडणूक #सहकारपॅनेल #संस्थापकपॅनेल
#रेठरेबुद्रुक #उंडाळकर #भोसलेगट #चांगभलं
#चांगभलंन्यूज #मोहितेगट #साप्ताहिकचांगभलं

0 टिप्पण्या