१२० किलो साखर, एफआरपी पेक्षा जादा दर अन् पाणीपट्टीची वार्षिक आकारणी : 'संस्थापक'च्या अर्चना मोहितेंचे सभासदांना आश्वासन
हैबत आडके |चांगभलं प्रतिनिधी, कराड
रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारखान्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून, संस्थापक पॅनलकडून विद्यमान सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. सभासदांचा कारखान्यावरील विश्वास कमी होत चालला असून, ही निवडणूक कारखान्याच्या भवितव्याची दिशा ठरवणारी ठरेल, असा दावा माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केला.
कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने संस्थापक पॅनेलच्या वतीने येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अविनाश मोहिते म्हणाले, कारखाना हा केवळ आर्थिक संस्था नसून हजारो शेतकरी आणि सभासदांच्या आशा-अपेक्षांचे केंद्र आहे. मात्र गेल्या काही वर्षांत सभासदांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले. ऊसतोडीचा प्रश्न गंभीर बनला असून, अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतातच उभा राहिला. सिंचन योजनांमध्ये नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. सभासदांना वेळेवर न्याय मिळत नसल्याने असंतोष वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला.
संस्थापक पॅनलच्या काळात कारखान्याने सभासदकेंद्री भूमिका घेतली होती. एफआरपीपेक्षा जादा ऊसदर देण्याची परंपरा निर्माण केली. शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी स्वतंत्र वीज फिडर उभारले. सभासदांना साखर योजनेचा थेट लाभ दिला. तसेच डिस्टिलरी आणि अन्य प्रकल्पांमधून कारखान्याची आर्थिक घडी मजबूत करण्याचे काम केले, असेही त्यांनी नमूद केले.
मागील निवडणुकांमध्ये मतांचे विभाजन आणि विविध राजकीय घडामोडींमुळे संस्थापक पॅनलला फटका बसल्याचे सांगत यंदा सभासदांमध्ये मोठे परिवर्तन दिसत असल्याचा दावा त्यांनी केला. या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा दबाव, आमिष किंवा हस्तक्षेप न होता पारदर्शक वातावरणात मतदान व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी संस्थापक पॅनलच्या उमेदवार अर्चना मोहिते यांनीही विद्यमान कारभारावर कठोर टीका केली. सभासद, कामगार आणि शेतकरी या तिन्ही घटकांच्या समस्या वाढल्या असून, कारखान्याचा कारभार सभासदांपासून दूर गेल्याची भावना निर्माण झाली आहे, असे त्या म्हणाल्या. हजारो सभासदांचे शेअर्स अद्याप वारसांच्या नावे वर्ग झालेले नाहीत. पाणीपट्टी आणि सिंचन व्यवस्थापनाचा ताळमेळ बिघडला असून, शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे, असे त्यांनी सांगितले.
संस्थापक पॅनलकडून लवकरच स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार असून, सभासदांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले जातील, अशी माहितीही त्यांनी दिली. सभासदांना साखर, ऊसदर आणि पाणीपट्टीबाबत दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरवण्याची तयारी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘कारखाना चालवण्यासाठी पूर्णवेळ नेतृत्व आवश्यक’
कारखान्याच्या प्रशासनात सातत्य आणि उपस्थिती अत्यंत महत्त्वाची असते. मात्र सध्याच्या कारभारात सभासदांना थेट संवादासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, अशी टीका करत अविनाश मोहिते यांनी विद्यमान व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सभासदांच्या तक्रारी, ऊसतोडीचे प्रश्न, पाणीपुरवठा आणि शेअर हस्तांतरण यांसारख्या विषयांवर निर्णय प्रक्रियेत विलंब होत असल्याचा आरोप त्यांनी केला. कारखाना हा केवळ पद धारण करण्याचा विषय नसून, सभासदांशी सातत्याने जोडलेले राहण्याची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘सभासदांचा सन्मान जपणारा कारभार देऊ’
सभासदांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये दर्जा आणि पारदर्शकता महत्त्वाची असल्याचे सांगत अर्चना मोहिते यांनी सभासदांचा सन्मान राखणारा कारभार देण्याचे आश्वासन दिले. सभासदांना मिळणारी साखर, पाणीपुरवठा आणि अन्य सुविधा या त्यांच्या हक्काच्या आहेत. त्यामुळे संस्थापक पॅनल सत्तेत आल्यानंतर सभासदांना अधिक दर्जेदार सेवा, नियोजनबद्ध सुविधा आणि थेट लाभ देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. कारखाना पुन्हा सभासदकेंद्री करण्यासाठीच ही निवडणूक लढवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अर्चना मोहिते यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे :-
- संस्थापक पॅनलने यापूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. त्यामुळे यंदाही सभासदांना दिलेला प्रत्येक शब्द पाळला जाईल, असा विश्वास अर्चना मोहिते यांनी व्यक्त केला.
- प्रत्येक सभासदाला दरवर्षी तब्बल १ क्विंटल २० किलो म्हणजेच १२० किलो साखर विनामूल्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ही साखर ‘फुकट’ नसून सभासद आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचे फळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
- चुकीच्या व्यवस्थापनामुळे कारखान्याच्या सिंचन योजना आर्थिक अडचणीत सापडल्याचा आरोप करत अनेक शेतकऱ्यांना पाणी मिळत नसतानाही मोठी पाणीपट्टी आकारली जात असल्याची टीका त्यांनी केली.
- सध्याची टनावर आधारित पाणीपट्टी रद्द करून ती वार्षिक निश्चित स्वरूपात करण्याचा निर्णय घेतला जाईल. शेतकऱ्यांना वर्षाला सुमारे साडेसात हजार रुपयांपर्यंतच पाणीपट्टी आकारली जाईल, असे त्यांनी सांगितले.
- सिंचन योजनांमधून सभासद शेतकऱ्यांना वर्षातून किमान १५ पाळ्या पाणी मिळालेच पाहिजे, यासाठी प्रभावी नियोजन केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
- उसाला एफआरपीपेक्षा जादा दर देण्याची संस्थापक पॅनलची परंपरा कायम ठेवली जाईल. सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणारी भूमिका घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
- संस्थापक पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ २ जून रोजी होणार असून, यावेळी आमदार शशिकांत शिंदे प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहितीही अर्चना मोहिते यांनी दिली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#संस्थापकपॅनेल #कृष्णाकारखानानिवडणूक #अविनाशमोहिते
#अर्चनामोहिते #रेठरेबुद्रुक #कृष्णाकारखाना #चांगभलं
#चांगभलंन्यूज #साप्ताहिकचांगभलं #चांगभलंसाप्ताहिक

0 टिप्पण्या