हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी कराड
कराड तालुक्यातील एकल महिलांच्या उन्नतीसाठी कराड पंचायत समिती कटिबद्ध असून त्यांना शासकीय योजनेची माहिती देणे, रोजगार व स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना बचत गटांशी जोडणे यावरती विशेष भर दिला जाणार आहे. महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण करून त्यांच्या समस्यांची नोंद घेत त्यावरती उपाय योजनेसाठी ही पंचायत समिती पाउले उचलणार असल्याचे प्रतिपादन उपसभापती सो.अनिताताई वेताळ यांनी केले.
यशवंतराव चव्हाण सभागृह (बचत भवन) येथे कराड पंचायत समिती, एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्यावतीने एकल महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सौ.विजयाताई थोरात, सौ.विद्याताई वेताळ, सौ.सुनंदाताई पाटील, पंचायत समिती सदस्य संग्रामबाबा पवार, सिध्दार्थ चव्हाण, रविंद्र बडेकर, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, ज्ञानदीप संस्था अध्यक्ष आनंदा थोरात, वैद्यकीय अधिकारी डॉ.मैथिली मिरजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपसभापती सौ.वेताळ म्हणाल्या, पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रथमच कराड तालुक्यामध्ये ज्ञानदीप सामाजिक संस्थेने एकल महिलांसाठी केलेले संघटन हे प्रेरणादायी आहे. मधुराणी थोरात यांनी एकल महिलांचे प्रश्न आणि त्यासाठी केलेले सेवाकार्य आपण सर्वांनी पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. महाराष्ट्र शासनाने ही याबाबत घेतलेले धोरणात्मक निर्णय हे एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण आहेत.
आनंदा थोरात म्हणाले, संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केलेला आंतरराष्ट्रीय विधवा दिवस हा महाराष्ट्रात विधवा या शब्दा ऐवजी अधिक सन्मानजनक एकल महिला असा उल्लेख करत एकल महिला दिवस म्हणून साजरा करण्याचा महाराष्ट्र शासनाचा क्रांतिकारी निर्णय आहे. पतीच्या निधनानंतर महिलांना सहन करावे लागणारे आर्थिक, सामाजिक आणि मानसिक कष्ट, भेदभाव तसेच त्यांच्या हक्काबद्दल समाजात जागृती निर्माण करणे हा या दिवसाचा महत्त्वाचा उद्देश आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजश्री शाहू महाराजांच्या विचाराने वाटचाल करताना आपण यापुढे विधवा या नकारात्मक आणि दुःखद शब्दा ऐवजी अधिक आदरयुक्त आणि सन्मानजनक असा एकल महिला हा शब्द अधिकृतपणे वापरण्याचा शासनाचा निर्णय सर्वांनी अंगीकारला पाहिजे. हा निर्णय केवळ शब्दाचा बदल नाही तर समाजाची मानसिकता बदलणारे एका क्रांतिकारी पाऊल आहे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक एकल भगिनींना समाजात मानाचे स्थान देऊयात. प्रत्येक सण समारंभात किंवा शुभ कार्यात त्यांना सन्मानाने आमंत्रित करून जुन्या कुप्रथांना कायमची तिलांजने देऊया.
यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षा निमित्त त्यांनी केलेल्या विविध महिलांसाठी कार्याची माहिती दिली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ.विद्याताई वेताळ, सौ.विजयाताई थोरात, संग्रामबाबा पवार यांनी आपल्या मनोगतामध्ये एकल महिलांचे प्रश्न मांडत समाजातील प्रत्येक महिलेला सन्मानाने जगण्याचा अधिकार असून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाचे लाभ तळागाळातील प्रत्येक पात्र महिलेपर्यंत पोहोचवला पाहिजे, असे आवाहन केले.
त्याचबरोबर समाजामध्ये त्यांना सन्मान देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
यावेळी वैशाली पाटील व शितल कुंभार यांनी एकल महिला म्हणून झालेला प्रवास आणि यामध्ये स्वबळावर येणाऱ्या प्रत्येक संकटावरती मात करत ज्ञानदीप संस्थेच्या माध्यमातून आणि मधुराणी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे वाटचाल कशी केली आणि आज महत्वपूर्ण जबाबदाऱ्या कशा पार पाडतात, याबाबतची यशोगाथा मांडली.
एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश विभुते यांनी स्वागत केले. सहाय्यक अधिकारी प्रतिभा लोंढे यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले. कार्यक्रमात निवेदिता कांबळे यांनी बालसंगोपन योजना, सविता कुडतरकर यांनी संजय गांधी निराधार योजना, पल्लवी पाटील यांनी घरकुल योजना, विद्या चव्हाण यांनी शिधापत्रिका काढणे व संबंधित कामे, काजल कुंभार यांनी अनाथ प्रमाणपत्र प्रमाणपत्र काढणे, आशादेवी चव्हाण यांनी महिला विषयक कायदेविषयक मार्गदर्शन, डॉ.मैथिली मिरजे यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन, कराड तालुका पोलीस ठाणे येथील महिला समुपदेशन केंद्रातील वैष्णवी यादव यांनी महिला समुपदेशन केंद्रातील मदत आदी विषयावरती मार्गदर्शन केले.
➖➖➖➖➖➖➖➖
#KaradNews #कराडपंचायतसमिती #एकलमहिला
#एकात्मिकबालविकासप्रकल्प #ज्ञानदीपसंस्था #चांगभलं
#चांगभलंन्यूजपेपर #चांगभलंसाप्ताहिक #चांगभलंन्यूज




0 टिप्पण्या