सातारा | चांगभलं वृत्तसेवा
पक्ष विरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व कराड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ यांच्यासह महादेव साळुंखे, सचिन नांगरे या तीन पदाधिकाऱ्यांची पाच वर्षासाठी हाकलपट्टी करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयातून पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, तसेच सातारा भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सूचनेवरून ही कारवाई करण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे. या तिन्ही पदाधिकाऱ्यांचे प्राथमिक सदस्यत्व गोठविण्यात आले असून पाच वर्षासाठी त्यांना पदमुक्त करण्यात आले आहे.
पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या सूचनेवरून करण्यात आलेल्या या कारवाईची माहिती खा. श्नी. छ. उदयनराजे भोसले, जिल्हा निवडणूक प्रभारी तथा संपर्क मंत्री श्नी. छ. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुलबाबा भोसले, कराड उत्तरचे आ. मनोज घोरपडे, पक्षाचे जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशील कदम यांना कळविण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये लोकसभा व विधानसभेला भाजप विरोधात काम केलेल्यांना जिल्हाध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले यांचे नेतृत्वाखाली उमेदवारी मिळाल्या आहेत, त्यावर पक्षाचा आक्षेप नसतो, मात्र पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून अपक्ष निवडणूक लढविणाऱ्यांना थेट कारवाई करत पक्षातून हकालपट्टी केली जात आहे, हे कसे ? असा प्रश्न सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्यांना पडला आहे. पक्ष वाढीसाठी ज्यांनी आजवर कठीण काळातही ठामपणे प्रस्थापितांच्या विरोधात ठाम राहून पक्षाचे काम केले, त्या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारी मध्ये विचार झाला नाहीच, शिवाय त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्यानंतर त्यांच्यावर थेट हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे, हा विरोधाभास भाजप मधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#रामकृष्णवेताळ #भाजप #BJP
#SataraPolitics #KaradNorth
#BJPAction #पक्षविरोधीकारवाई
#भाजपहकालपट्टी #राजकीयबातमी
#ChangbhalaNews #चांगभलंन्यूज

0 टिप्पण्या