कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर व थोर हुतात्म्याने भारतीय लोकशाही निकोप व्हावी म्हणून निवडणुकीची पद्धत दिली .मात्र कदाचित भारताच्या आजूबाजूच्या शत्रूकडून भारतीय लोकशाहीला धोका पोहोचणार नाही. मात्र निवडणुकीच्या बदलत्या चाली आणि रीतीमुळे लोकशाहीला धोका निर्माण होईल की काय ? अशी भीती थोर साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केली. तर अशा पार्श्वभूमीवर लोकांना स्पष्टपणे न्याय देणाऱ्या भूषण गवई या एका झुंजार न्यायमूर्तींना प्रदान करण्यात येत असलेला स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार हा जणू थोर हुतात्म्याचा आशीर्वादच आहे, असेही त्यांनी नमूद केले.
येथील स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या ५२ व्या स्मृतिदिनानिमित्त व ४३ वा स्वातंत्र्य संग्राम सैनिक व माजी सैनिक मेळावा आणि यावर्षीचा स्वातंत्र्य दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व रोख ५१ हजार रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. या कार्यक्रमास मेघालय हायकोर्टाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती रणजीत मोरे, मुंबई हायकोर्टाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती प्रदीप देशमुख-पाटील, अँड उदयसिंह पाटील-उंडाळकर, अँड विजयराव पाटील-उंडाळकर, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विश्वास पाटील म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात थोर हुतात्म्यांनी त्यागाचे बलिदान दिले.आज त्यांच्या त्यागामुळे समाजव्यसस्था उभारली असली तरी सामाजिक विषयांचे आव्हान कायम आहेत. त्याचा आशय आपण विसरता कामा नये अन्यथा आपण आपल्या स्वातंत्र्यसैनिकांसोबत आपल्या आजादीच्या लढाईशी केलेली ती प्रतारणा ठरेल. पूर्वी तुझी जात कोणती? हे विचारले जायचे . आता तुझा धर्म कोणता म्हणून विचारले जात आहे. परंतु भगवान बुद्ध, भगवान महावीर ,शिवाजी महाराज, महात्मा गांधी ते डॉ बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या दृष्टीने माणूसकीचा धर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे, हे आपण विसरता कामा नये.
लोकशाही मध्ये अनेक अनिष्ट प्रथा रूढ होत आहेत. लोकशाही निकोप व्हावी म्हणून मतदानाचा हक्का दिला. कुणालाही एकट्या व्यक्तीला लोकशाहीचा अधिकार जाऊ नये म्हणून गावच्या ग्रामपंचायती पासून पार्लमेंट पर्यंत लोक निवडून दिले जावेत , हे डॉ बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं पण आता निवडणूक आली की पोटात गोळा उठतो ? कधी एकदा संपते निवडणूक अशी स्थिती निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या काळात हिंसाचार ,भ्रष्टाचार आणि अत्याचार इतके होतात की नको ही निवडणूक ? अशी मानसिकता निर्माण होऊ लागली आहे. कदाचित भारताच्या आजूबाजूच्या शत्रूकडून भारतीय लोकशाहीला धोका पोहोचणार नाही. मात्र निवडणुकीच्या बदलत्या चाली आणि रीतीमुळे लोकशाहीला धोका निर्माण होईल की काय ? अशी भीती विश्वास पाटील यांनी व्यक्त केली.
सेवानिवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात दादासाहेब उंडाळकर यांचे योगदान मोलाचे आहे.त्यांनी महात्मा गांधींच्या व यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कराड येथे २४ ऑगस्ट रोजी काढलेला मोर्चा हा स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचा दिवस ठरला आहे. सत्याग्रह व भूमिगत अशा दोन पद्धतीने स्वातंत्र्य लढ्याची उभारणी करणेत आली होती. यशवंतराव चव्हाण साहेब हे भूमिगत तर दादासाहेब उंडाळकर हे सत्याग्रह पध्दतीने लढा देत होते.
स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असतानाही विभागातील शिक्षण, पाणी या सारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. शिक्षणाची त्यांनी कधीच कास सोडली नाही. म्हणून त्यांनी आपल्या तीन मुलांना उच्च शिक्षित करण्याबरोबरच सर्वसामान्य लोकांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून शिक्षणाचे दालन उभे केले, हे त्यांचे कार्य कधीच पुसले जाणार नाही. स्वर्गीय विलासकाका पाटील यांचे माझ्या जीवन घडणीत मोलाचे योगदान असून त्यांचे आणि माझ्या कुटुंबाचे कौटुंबिक संबंध होते.आज त्यागाची भूमी असणाऱ्या उंडाळे गावात थोर स्वातंत्र्य सैनिक दादा उंडाळकर स्मारक समितीच्यावतीने देण्यात आलेला दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार हा थोर साहित्यिक विश्वासराव पाटील यांचे हस्ते प्रदान केला, त्याबद्दल त्यांनी स्मारक समितीचे आभार मानून पुरस्काराची रोख रक्कम ५१ हजार इतक्या रक्कमेचा धनादेश स्मारक समितीला देण्याचे जाहीर करून ही रक्कम दहावीच्या विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात देण्याची सूचना केली.
प्रास्ताविक व स्वागत अँड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी केले तर आभार प्रा. धनाजी काटकर यांनी मानले. या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, माजी सैनिक, वकील रयत संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
#Undale #Karad #DadaUndalkar #BhooshanGavai #VishwasraoPatil #लोकशाही #भारतीयराज्यघटना #BabasahebAmbedkar #FreedomFighter #SocialAward #KaradNews #ChangbhalaNews #स्मृतिदिन #स्वातंत्र्यसैनिक #माजीसैनिकमेळावा


0 टिप्पण्या