कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कराड तालुक्यातील बनवडी येथील पार्लेकरनगरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. सामाजिक जागर, शैक्षणिक प्रेरणा आणि संविधानिक मूल्यांचा संदेश देणारा हा कार्यक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी वैचारिक मंथन घडवून आणणारा ठरला.
यावेळी प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : जीवन व कार्य’ या विषयावर मार्गदर्शन करताना संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, संविधान हे केवळ कायद्यांचे संकलन नसून समाजातील सर्व घटकांना समानतेच्या धाग्यात बांधणारी एक सशक्त मूल्यव्यवस्था आहे. या मूल्यांचे जतन आणि अंमलबजावणी ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दिलीपकुमार कसबे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांची आजच्या समाजरचनेत असलेली गरज अधोरेखित केली. तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शिक्षणप्रधान विचारांचा उल्लेख करत सामाजिक परिवर्तनात त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली.
या कार्यक्रमास जि.प. सदस्य सागर शिवदास, पं.स. सदस्या माधवी पाटसुपे, माजी सरपंच शंकरराव खापे, पांडुरंग कोठावळे, माजी उपप्राचार्य शिवाजीराव पाटील, प्रा. अजित पवार, सोसायटीचे चेअरमन प्रकाश साठे, उपाध्यक्ष सुनील पानसकर, सचिव यशवंत देवकांत, निवृत्त नायब तहसीलदार राजाराम पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. तसेच सागर शिवदास व शंकरराव खापे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक प्रकाश साठे यांनी केले. सूत्रसंचालन किरण ताटे व अनुराधा कांबळे यांनी केले, तर आभार प्रा. पांडुरंग बनसोडे यांनी मानले. कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#KaradNews #बनवडीन्यूज #डाॅ.आंबेडकरजयंती
#चांगभलं #साप्ताहिकचांगभलं #चांगभलंन्यूज
#ChangbhalaNews

0 टिप्पण्या