कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी सौ. तेजस्विनी संग्राम घोरपडे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष आ. अतुल भोसले यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली. पक्षाच्या संघटन विस्ताराच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात असून, त्यांच्या कामाच्या अनुभवावर विश्वास व्यक्त करत ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे..
स्वाभिमानी महिला सखी मंचच्या कार्याध्यक्षा म्हणून कार्य करताना त्यांनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात सुमारे २५ हजार महिलांचे सक्षम संघटन उभे केले आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि अभ्यासू वृत्तीमुळे त्या परिसरात प्रभावी महिला नेत्या म्हणून ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या आहेत.
तेजस्विनीताई या कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्या कुटुंबातील असून, युवा उद्योजक संग्राम घोरपडे यांच्या पत्नी आहेत. पक्ष संघटनेत सक्रिय सहभाग आणि महिलांमध्ये जनजागृती करण्याच्या भूमिकेमुळे त्यांना जिल्हास्तरीय जबाबदारी देण्यात आली असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. त्यांच्या नियुक्तीमुळे महिला आघाडीच्या कामकाजाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या निवडीसाठी भाजपच्या प्रदेश महिला अध्यक्षा चित्राताई वाघ यांचा विशेष पुढाकार होता. तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार उदयनराजे भोसले, माजी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, आ. अतुल भोसले आणि आ. मनोज घोरपडे यांनी तेजस्विनीताईंचे अभिनंदन केले आहे. जिल्हाभरातूनही त्यांच्या निवडीचे स्वागत होत आहे.
" आतापर्यंत कराड उत्तरमध्ये काम केले; यापुढे संपूर्ण जिल्ह्यात महिला संघटन बळकट करण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जुने-नवे पदाधिकारी यांना सोबत घेऊन पक्षवाढीसाठी प्रयत्नशील राहीन. "
- तेजस्विनी संग्राम घोरपडे, जिल्हाध्यक्ष (महिला), भाजपा सातारा

0 टिप्पण्या