‘संस्कृत’चा जाणीवपूर्वक समावेश करा; भाषिक ओळख जपण्यासाठी नागरिकांना धारेश्वर महाराज यांचे आवाहन
कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
भारतीय संस्कृतीची मुळे ज्या भाषेत रुजली आहेत, त्या संस्कृतच्या जतनासाठी आगामी जनगणना महत्त्वाची ठरणार असल्याचे मत धारेश्वर मठाचे मठाधिपती पूज्य आदिश्वर नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांनी व्यक्त केले. मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होणाऱ्या जनगणना प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाने आपल्याला अवगत असलेल्या भाषांमध्ये ‘संस्कृत’चा जाणीवपूर्वक समावेश करावा, असे त्यांनी आवाहन केले.
जनगणनेदरम्यान नागरिकांकडून मातृभाषेसह इतर ज्ञात भाषांची माहिती नोंदवली जाते. मात्र, अनेकदा संस्कृतचा उल्लेख टाळला जातो. प्रत्यक्षात प्रार्थना, मंत्रोच्चार, धार्मिक विधी आणि दैनंदिन व्यवहारातील अनेक शब्दांमधून संस्कृतचा वापर होत असतो. त्यामुळे ती केवळ प्राचीन भाषा नसून आजही आपल्या जीवनात सक्रिय आहे, याची जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मागील जनगणनेत संस्कृत भाषिकांची संख्या तुलनेने अत्यल्प नोंदली गेल्याचे दिसून आले आहे. याउलट इतर परकीय भाषांचा समावेश मोठ्या प्रमाणावर झाला आहे. ही स्थिती कायम राहिल्यास संस्कृतचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
त्यांच्या मतानुसार, संस्कृतचे महत्त्व केवळ भाषिक मर्यादेत नसून, वेद, उपनिषद, पुराणे आणि विविध धर्मग्रंथांच्या अभ्यासाशी ते निगडित आहे. या भाषेचे अस्तित्व कमी झाल्यास संशोधन, साहित्यनिर्मिती आणि सांस्कृतिक परंपरांवरही दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भाषिक जाणीव वाढवणे आणि जनगणनेत अचूक नोंद करणे गरजेचे आहे.
दैनंदिन संभाषणात ‘नमस्ते’, ‘आरती’, ‘प्रदक्षिणा’, ‘नैवेद्य’, ‘आहार’, ‘जलपान’, ‘संग्रह’, ‘सर्व’ अशा असंख्य शब्दांचा वापर होत असल्याने संस्कृत ही ‘मृत’ भाषा नसून ती आपल्या संस्कारांचा अविभाज्य भाग असल्याचेही अधोरेखित होत आहे.
जनगणनेच्या वेळी नागरिकांनी फक्त मातृभाषाच नव्हे, तर त्यांना समजणाऱ्या किंवा वापरात असलेल्या सर्व भाषांची नोंद प्रामाणिकपणे करावी. संस्कृतसह हिंदी, कन्नड, गुजराती, तेलुगू यांसारख्या भाषांचाही समावेश केल्यास देशाची खरी भाषिक विविधता अधोरेखित होईल.
संस्कृत ही भारतीय भाषांची जननी मानली जाते. तिचे जतन आणि संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून, समाजातील प्रत्येक घटकाने त्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. जाणीवपूर्वक केलेली छोटी कृतीही मोठा बदल घडवू शकते, हा संदेश देत नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन धारेश्वर महाराज यांनी केले आहे.
"आगामी जनगणना ही केवळ लोकसंख्येची मोजणी नसून, भाषिक आणि सांस्कृतिक ओळख जपण्याची संधी आहे. संस्कृतचा जाणीवपूर्वक समावेश करून तिच्या अस्तित्वाला बळ देणे, हीच खरी संस्कृतीप्रती कृतज्ञता ठरेल."
-- पूज्य आदिश्वर नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज (मठाधिपती, धारेश्वर मठ, धारेश्वर)

0 टिप्पण्या