सातारा | चांगभलं वृत्तसेवा
सातारा जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प असलेल्या उरमोडी धरणाच्या जलाशयाला ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ असे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. जलसंपदा विभागाच्या या निर्णयामुळे जिल्ह्याच्या इतिहास, परंपरा आणि स्थानिक लोकभावनांना योग्य तो सन्मान मिळाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
सातारा, खटाव आणि माण या दुष्काळप्रवण तालुक्यांसाठी उरमोडी धरण हा जीवनदायी प्रकल्प ठरला आहे. विशेषतः पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला या धरणामुळे मोठा आधार मिळाला असून हजारो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. या जलाशयाला ऐतिहासिक महत्त्व असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे नाव देण्याची मागणी स्थानिक स्तरावर अनेक वर्षांपासून केली जात होती.
या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेला नामकरणाचा निर्णय स्थानिक जनतेसाठी समाधानकारक ठरला आहे. ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले’ या नावामुळे सातारा जिल्ह्याच्या सांस्कृतिक ओळखीला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांचे उरमोडी प्रकल्प उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे कोरडवाहू भागातील शेतीला पाण्याचा आधार मिळाला. परिणामी, पिकांची उत्पादकता वाढून शेतीत विविधता आली आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली.
राजकारण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात अभयसिंहराजे भोसले यांनी भरीव कार्य केले. शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले. शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान लक्षणीय मानले जाते. त्यामुळे त्यांच्या नावाने जलाशयाचे नामकरण करणे ही जनभावनेची दखल असल्याचे मत व्यक्त होत आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या पुढाकारातून उरमोडी प्रकल्पाच्या कालव्यांची कामेही गतीने सुरू आहेत. या निर्णयामुळे प्रकल्पाशी संबंधित विकासकामांना आणखी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

0 टिप्पण्या