कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहन (EV) तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण उपक्रम शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथे उत्साहात पार पडला. उद्योगक्षेत्राशी थेट जोड निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम एल.अँड.टी. एज्युटेक, चेन्नई यांच्या सहकार्याने ६ व ७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला.
या प्रशिक्षणात बी.टेक. द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा ‘हँड्स-ऑन’ अनुभव घेतला. महाविद्यालयातील सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) मध्ये पार पडलेल्या या उपक्रमाचे मुख्य समन्वयक प्रा. डॉ. गुरुनाथ व्ही. शिंदे होते. प्रा. देविदास कोळसे व प्रा. शीतल जाधव यांनी सहसमन्वयक म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. प्राचार्य डॉ. एस.जे. वाघ, उपसंचालक डॉ. एस.के. पाटील तसेच व्यवस्थापन प्रमुख दीपक हारके यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला.
प्रशिक्षणादरम्यान इलेक्ट्रिकल शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘इलेक्ट्रिक वाहनांसाठी एम्बेडेड सिस्टम’ या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. STM32IDE चा वापर करून सर्किट डिझाईन, कोडिंग, LED ब्लिंकिंग, OLED डिस्प्ले, अल्ट्रासोनिक सेन्सिंग आणि DC मोटर स्पीड कंट्रोल यांसारख्या प्रयोगांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाले.
मेकॅनिकल विभागासाठी ‘बीईव्ही (BEV) आणि एफसीईव्ही (FCEV) साठी मल्टीफिजिक्स आधारित डिझाईन आणि विकास’ या विषयावर मार्गदर्शन करताना फायनाईट एलिमेंट ॲनालिसिस, स्ट्रक्चरल स्टडी, फटीग ॲनालिसिस आणि मोडल-हार्मोनिक ॲनालिसिस यांसारख्या तांत्रिक बाबींचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आले.
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष EV सेटअपवर काम करण्याची संधी मिळाली. एम्बेडेड सिस्टम सत्रात २५ तर मल्टीफिजिक्स सत्रात २४ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
समारोप सोहळ्यात मागील वर्षीच्या EV बॅचमधील उत्कृष्ट १० विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञानापुरते मर्यादित न राहता, प्रत्यक्ष उद्योगातील वापरात येणाऱ्या तंत्रज्ञानाचा अनुभव मिळाला. भविष्यातील ई-वाहन उद्योगात करिअर घडविण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले.
#Karad #EVTraining #ElectricVehicles #EngineeringStudents #LTEdutech #SkillDevelopment #FutureTech #ChangbhalaNews

0 टिप्पण्या