🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

हस्तलिखिते ज्ञानभारतम् ॲपवर अपलोड करावी - मराठी भाषा सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांचे आवाहन

 


ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई | चांगभलं वृत्तसेवा

भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ज्ञानभारतम् (Gyan Bharatam) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला दि. १६ मार्च २०२६ पासून प्रारंभ करण्यात आला आहे. सर्वेक्षणासाठी ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत “Gyan Bharatam” हे मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले असून त्याद्वारे हस्तलिखितांचे क्षेत्रीय मूल्यांकन, पडताळणी व दस्तऐवजीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. यानिमित्ताने आपल्याकडे जर काही हस्तलिखिते उपलब्ध असतील तर त्याची माहिती ज्ञानभारतम् या मोबाईल ॲपवर अपलोड करावी व या राष्ट्रकार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांनी केले आहे.

भारताला हस्तलिखितांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. पारंपारिक ज्ञान हस्तलिखितांद्वारे प्रसारीत होत आलेले आहे. परंतु ही सर्व हस्तलिखिते विखुरलेल्या स्वरुपात आहेत. सदरील हस्तलिखिताचे ज्ञानभंडार एकत्र करुन एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देता यावे या दृष्टीने भारत सरकारने ज्ञानभारतम् या प्रकल्पाची आखणी केली आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश देशातील मौल्यवान हस्तलिखित वारशाचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन व प्रसार करणे हा आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशभरातील शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये, धार्मिक संस्था तसेच खाजगी संग्राहक यांच्या सहकार्याने एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध व नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेशी संबंधित हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह (National Digital Repository) निर्माण करून तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. यामध्ये हस्तलिखितांची मालकी ही संबंधीत संस्था, ग्रंथालय अथवा खाजगी संग्राहक यांचीच राहणार आहे. परंतु कोणाला सदरील हस्तलिखिते शासनाकडे सुपूर्द करावायाची झाल्यास शासन ती स्विकारेल.
या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारांची महत्त्वपूर्ण भूमिका असून राज्यातील विविध सांस्कृतिक संस्था, विद्यापीठे, संशोधन संस्था, हस्तलिखित संग्रहालये तसेच विद्वान यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात या प्रकल्पासाठी कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर (क्लस्टर केंद्र); भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे (क्लस्टर केंद्र); आनंद आश्रम संस्थान, पुणे (स्वतंत्र केंद्र) आणि भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे हे स्वतंत्र केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्यासाठी राज्य नोडल संस्था म्हणून पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्य नोडल अधिकारी म्हणून श्री. सुजितकुमार उगले, संचालक, पुराभिलेख संचालनालय कार्य पाहणार आहेत. तर श्रीमती. अंजली ढमाळ, उपसंचालक, मराठी भाषा विकास संस्था, तथा अभिजात मराठी भाषा कक्षा, मराठी भाषा विभाग या सहनोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
या मोहिमेच्या अनुषंगाने सर्व जिल्हाधिकारी यांना त्यांच्या जिल्ह्यात ज्ञानभारतम् प्रकल्पासाठी जिल्हा नोडल अधिकारी नियुक्त करणे, जिल्हास्तरीय समिती स्थापन करणे, तसेच मंदिरे, मठ, धार्मिक संस्था, विद्यापीठे, ग्रंथालये, शैक्षणिक संस्था व खाजगी संग्राहक यांना सर्वेक्षणात सहभागी करून घेणे याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

या सर्वेक्षण मोहिमेत शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, संग्रहालये, संस्कृत पाठशाळा, धार्मिक संस्था, संशोधक, पारंपरिक पंडित, तसेच NCC, NSS स्वयंसेवक, विद्यार्थी व वारसा संवर्धन संस्था यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असल्याचे मराठी भाषा सचिव डॉ.कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या