पुणे - कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
भारतीय सशस्त्र दलांसोबत अत्यंत जबाबदारीने आणि समर्पित भावनेने कार्य करत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या संरक्षण जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण यांना प्रतिष्ठित ‘दक्षिणी कमान लष्कर प्रमुख पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
हा मानाचा सन्मान दक्षिण कमांडचे सरसेनापती लेफ्टनंट जनरल धीरज सेठ (पीव्हीएसएम, यूवायएसएम, एव्हीएसएम, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, सदर्न कमांड पुणे)
यांच्या हस्ते पुण्यातील समारंभात प्रदान करण्यात आला. चव्हाण हे भारतीय माहिती सेवेत कार्यरत असून संरक्षण क्षेत्रातील जनसंपर्क आणि माध्यम समन्वयात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
विशेष म्हणजे, सन १९८४ नंतर हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळवणारे ते पुण्यातील पहिले नागरी संरक्षण जनसंपर्क अधिकारी ठरले आहेत. त्यांच्या कार्यातील शिस्त, अचूकता आणि जबाबदारीची जाणीव यामुळे भारतीय सशस्त्र दलांसोबत प्रभावी संवाद आणि समन्वय साधण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
संवेदनशील माहितीचे योग्य व्यवस्थापन, माध्यमांशी सुसंवाद आणि लष्करी कार्यपद्धतीबाबत पारदर्शकता राखत त्यांनी केलेले काम विशेष दखलपात्र ठरले आहे. नागरी अधिकारी असूनही लष्करी व्यवस्थेसोबत सुसंगतपणे काम करत त्यांनी उच्च आदर्श निर्माण केला आहे.
ग्रामीण पार्श्वभूमीतून राष्ट्रीय स्तरावर झेप....
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील खुनेश्वर या छोट्या गावातून आलेले अंकुश चव्हाण यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर मानाचा सन्मान पटकावला आहे. कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र शाखेचे माजी विद्यार्थी असलेले चव्हाण यांनी ग्रामीण पार्श्वभूमीतून पुढे येत संरक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या या यशामुळे केवळ त्यांच्या कुटुंबाचा नव्हे, तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा अभिमान उंचावला असून ग्रामीण भागातील तरुणांसाठी त्यांनी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
त्यांच्या कर्तुत्वाच्या उत्तुंग भरारीला 'चांगभलं न्यूज'चा सलाम !
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#Solapur #PuneNews #SataraNews #Kolhapur
#KolhapurNews #AnkushChavan #IndianArmy
#ChangbhalaNews #राष्ट्रसर्वतोपरी #BrakingNews
#Maharashtra

0 टिप्पण्या