हैबत आडके, कराड | चांगभलं वृत्तसेवा
सातारा जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरणांमध्ये कराड तालुक्याचा प्रभाव कमी होत चालल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदानंतर आता सभापती निवडीतही कराड उत्तर व दक्षिण या दोन्ही विधानसभा मतदारसंघांना संपूर्णतः डावलण्यात आल्याने स्थानिक पातळीवर नाराजी व्यक्त होत आहे.
४ एप्रिल रोजी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती निवडीत भाजप व राष्ट्रवादीच्या फुटीर सदस्यांना प्रत्येकी दोन पदे मिळाली. मात्र, निवड झालेल्या चारही सभापतींपैकी एकही सदस्य कराड तालुक्यातील नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
जिल्हा परिषदेत कराड तालुक्याचे भाजपचे तब्बल ९ सदस्य असतानाही अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती या एकाही महत्त्वाच्या पदावर कराडला संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्षपद कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्याकडे असताना, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे असताना, म्हणजेच कराडला दक्षिण व उत्तर असे कराडला दोन आमदार असतानाही जिल्ह्याच्या राजकारणात कराड तालुक्यातील नेतृत्व प्रभावी का ठरले नाही, अशी चर्चा आता रंगली आहे.
२० मार्च रोजी झालेल्या निवडीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या प्रिया शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी भाजपचे राजू भोसले यांची निवड झाली होती. तर आज, दि.४ एप्रिल रोजी झालेल्या सभापती निवडीत समाज कल्याण समितीवर ऋषिकेश धायगुडे (भाजप), महिला व बालकल्याण समितीवर ऋतुजा विराज शिंदे (राष्ट्रवादी), तर विषय समित्यांवर तेजस्विनी विक्रमशिल कदम (भाजप) आणि लता अविनाश कर्णे (राष्ट्रवादी) यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. प्रत्येक पदासाठी एकच अर्ज आल्याने निवड प्रक्रिया निर्विघ्न पार पडली.
दरम्यान, या निवडीदरम्यान राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या सदस्यांनी काळ्या फिती लावून सभागृहात प्रवेश करत निषेध नोंदवला आणि प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचा आरोपही विरोधकांनी केला.
सभागृहाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही सदस्यांना गेटपास असूनही प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप करत पोलिसांशी वादावादी झाल्याचेही दिसून आले. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या पार्श्वभूमीवर २० मार्च रोजी झालेल्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीतील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला. त्या वेळीही भाजपने विरोधी गटातील सदस्य फोडून सत्ता मिळवली होती. कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसतानाही राजकीय डावपेचांमुळे भाजपने सत्ता स्थापन केली होती.
दरम्यान, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
एकूणच, सातारा जिल्हा परिषदेतील सत्तास्थापन प्रक्रियेत कराड तालुक्याला वारंवार डावलले जात असल्याने स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, 'जिल्ह्याच्या राजकारणात कराडची राजकीय ताकद कमी झाली का?' असा सवाल उपस्थित केला जात आहे.




0 टिप्पण्या