🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

‘येडोबाच्या नावानं चांगभलं’चा गजर; ; लाखो भाविकांच्या साक्षीने मुख्य छबिना उत्साहात

 


महाराष्ट्र-कर्नाटकातून भाविकांची उपस्थिती ; ३५ गावच्या मानाच्या सासनकाठ्यांचा सहभाग

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
पाटण तालुक्यातील श्री क्षेत्र येराड (बनपेठ) येथे पारंपरिक ‘येडोबा’ यात्रेला यंदाही अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ‘येडोबाच्या नावानं चांगभलं’, ‘नाईकबाच्या नावानं चांगभलं’ आणि ‘जोगेश्वरीच्या नावानं चांगभलं’ या जयघोषात ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलाल-खोबर्‍याच्या उधळणीत मुख्य छबिना शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्रासह कर्नाटकातून लाखो भाविकांनी या यात्रेत सहभागी होत भक्तीचा उत्सव साजरा केला.
कोयना नदीकाठी वसलेल्या निसर्गरम्य आमराईत असलेले येडोबा देवस्थान हे जागृत स्थान म्हणून ओळखले जाते. गुरुवारपासून सुरू झालेल्या यात्रेत प्रथम देवास तेल व धूप अर्पण करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी लहान छबिना आणि शनिवारी दुपारी एक वाजता मुख्य छबिना काढण्यात आला.


मुख्य छबिन्यात येराडसह नाटोशी, धावडे, सुरूल, नेरळे, गुंजाळी, काळमवाडी, वाटेगाव, पेठ आदी सुमारे ३५ गावांच्या मानाच्या सासनकाठ्या व पालख्या सहभागी झाल्या होत्या. ढोलकरी, तरुणांचा उत्साही सहभाग आणि पारंपरिक विधींनी छबिन्याची रंगत अधिकच वाढवली. नाईकबा मंदिराजवळ पोहोचताच गुलालाची उधळण झाल्याने संपूर्ण परिसर गुलाबी रंगात न्हाऊन निघाला.
कडक उन्हाळ्याची तमा न बाळगता लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यात्रेसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, पुणे, मुंबई तसेच कोकणातून मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली होती.
यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन केले होते. मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी रांग व्यवस्थापन, वाहनतळ, तसेच अतिरिक्त एसटी बसेसची सोय करण्यात आली होती.
शनिवारी मध्यरात्री पारंपरिक ‘रिंगवण’ विधीने यात्रेची सांगता झाली. यात्रा शांततेत व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महसूल विभाग, पोलीस प्रशासन, देवस्थान कमिटी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.




छबिन्याची वैशिष्ट्ये....!


या मुख्य छबिन्याची खासियत म्हणजे सुमारे ३५ गावांच्या मानाच्या सासनकाठ्या आणि पालख्या यात सहभागी झाल्या होत्या. ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. विशेषतः तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लक्षवेधी ठरला. नाईकबा मंदिराजवळ छबिना पोहोचताच लाखो भाविकांनी गुलालाची उधळण केल्याने परिसर अक्षरशः लाल रंगात न्हाऊन निघाला.


प्रशासनाचे नियोजन.....


लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाने चोख नियोजन केले होते. मंदिर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाविकांना सुरळीत दर्शन मिळावे यासाठी रांग व्यवस्थापनाची योग्य अंमलबजावणी करण्यात आली. तसेच वाहनतळाची सोय करून वाहतूक नियंत्रणात ठेवण्यात आले. विविध ठिकाणांहून अतिरिक्त एसटी बसेस सोडून भाविकांच्या प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. महसूल व पोलीस यंत्रणा यात्राकाळात सतत सतर्क होती.


फोटो - येराड : येडोबा देवाच्या यात्रेचे ड्रोनच्या साहाय्याने घेतलेले छायाचित्र. (छाया : वैभव देशमुख, कोयनानगर)
फोटो - येराड : येडोबा देवाचा निघालेला मोठा छबिना.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या