🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

स्मार्ट मीटरला कडाडून विरोध; कृषी ड्रम घोटाळ्यावर चौकशीची मागणी

 


कराड पंचायत समितीची पहिलीच सभा गाजली; नवख्या सदस्यांची आक्रमक सुरुवात

हैबत आडके, कराड | चांगभलं वृत्तसेवा

प्रदीर्घ प्रशासकीय राजवटीनंतर झालेल्या कराड पंचायत समितीच्या पहिल्याच मासिक बैठकीत नवख्या सदस्यांनी कृषी, शिक्षणासह वीज वितरण विभागाच्या कारभारावर प्रश्नांचा भडिमार करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कराड तालुक्यात कृषी विभागामार्फत ६२५ शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी दिलेले २ हजार रुपये अनुदान परत घेत त्यांना ४०० रुपयांचे निकृष्ठ दर्जाचे ड्रम देण्यात आले. या ड्रम वाटपात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत याची चौकशी करण्यात यावी तसेच स्मार्ट मीटरला शेतकऱ्याचा विरोध असून ते तालुक्यात बसवण्यात येऊ नयेत, स्मार्ट मीटर बाबत दोन दिवसात विशेष बैठक बोलवा, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सदस्यांनी सभापती यांच्याकडे केली.

कराड पंचायत समितीची पहिली मासिक सभा यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवारी सभापती नंदाताई यादव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती अनिता वेताळ, गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सभागृहातील नवख्या सदस्यांनी विविध विभागांच्या चांगल्या कामाचे कौतुक करत, कामचुकार अधिकाऱ्यांना धारेवर धरले, आणि योजनांमधील त्रुटींवर आक्षेप घेत पहिलीच सभा दणाणून सोडली.

शिक्षण, अर्थ, आरोग्य या विभागांचा कारभार अत्यंत पारदर्शक आणि चांगला हवा, अशी भूमिका सदस्य नितीन थोरात यांनी मांडली. त्यासोबत 'पाणीपुरवठा' आणि 'बांधकाम विभागाचे' ही काम चांगले हवे, असा आग्रह सदस्य धनंजय पाटील यांनी धरला. तालुका कृषी अधिकारी प्रशांत शिंदे हे कृषी विभागाचा आढावा देत असताना , सदस्य रवींद्र बडेकर, नितीन थोरात, संग्राम पवार यांनी कराड तालुक्यात कृषी विभागामार्फत ६२५ शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी २ हजार रुपये अनुदान पोर्टलवरून देण्यात आले होते, मात्र, ते नियमबाह्यपणे अधिकाऱ्यांनी पुन्हा परत घेऊन त्या शेतकऱ्यांना ४०० रुपयांचे निकृष्ट दर्जाचे ड्रम दिले, त्यामुळे या ड्रम खरेदीमध्ये मोठा घोटाळा असल्याचा संशय व्यक्त करत याप्रकरणी सभापतींनी सखोल चौकशीची प्रक्रिया राबवावी, अशी थेट मागणी केली.
त्यावरून सभागृहात जोरदार चर्चा झाली. अखेर सभापती यादव यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव देऊन सखोल चौकशीची मागणी करू, असे सभागृहात जाहीर केले

शिक्षण विभागाचा आढावा गटशिक्षणाधिकारी मोरे यांनी सादर केला. यावेळी सदस्य संग्राम पवार, नितीन थोरात, रवींद्र बडेकर यांनी तालुक्यात खाजगी शाळांचे मोठे आव्हान निर्माण झाले असल्याने जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थ्या संख्या वाढविण्यासाठी स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे, शौचालये , सीसीटीव्ही, आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी काही निधी, या पद्धतीने वेगवेगळ्या दर्जेदार सुविधा द्याव्या लागतील, त्यासाठी सभागृहाला सहकार्य असेल, असे सांगितले.

जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. इंग्लिश मिडीयम शाळेशी तुलना केली जाते, असे सांगत अंगणवाड्यामध्येही स्वच्छतागृहांची सुविधा द्यावी लागेल, अशी मागणी महिला सदस्यांनी केली. त्यावर एक कमिटी नेमून तालुक्यातील सर्व शाळांचा सर्वे करण्याची मागणी सदस्य संग्राम पवार यांनी केली. साताऱ्यात झालेल्या राजकीय निवडीवेळी काले जिल्हा परिषद मतदार संघातील 'थोरात' नावाचे शिक्षक ऑन ड्युटी हजर होते, त्याच्या व्हिडिओ क्लिप असल्याचा थेट आरोप भाजपचे सदस्य धनंजय पाटील यांनी करत याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सभापती यांच्याकडे केली.

वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता घारे हे आढावा देण्यासाठी उभे राहिल्यानंतर 'कार्यकारी अभियंता' का आले नाहीत? तुम्ही निर्णय घेऊ शकता का? नव्या सदस्यांची पहिलीच मासिक बैठक होत असूनही प्रमुख अधिकारी गैरहजर रहात असतील तर तालुक्याचे प्रश्न सुटणार कसे? असा मुद्दा सदस्य नितीन थोरात यांनी मांडला. अधिकारी मीटिंगला उपस्थित राहत नसतील तर काय उपयोग? तर तालुक्यात परवानगी नसतानाही स्मार्ट मीटर बसवले जात आहेत, हा अन्याय असून तालुक्यात नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसू नये यासाठी स्मार्ट मीटर अजिबात बसवू नका, तसा ठराव घेण्यात यावा, अशी सूचना सदस्य संग्राम पवार यांनी केली. याचे समर्थन करताना मीटरचे इंडिकेटर सुरू राहिले तरी बिल येते, असे सदस्य थोरात यांनी सांगून लोकांचा विरोध असताना जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवू नका, अशी मागणी केली.

वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक सुनीला लाळे यांनी आढावा दिल्यानंतर, प्रसूती विभागाचे काम अतिशय छान असल्याने वैद्यकीय अधीक्षकांच्या अभिनंदनाचा ठराव सदस्यांनी मांडला. मात्र त्याचवेळी उपजिल्हा रुग्णालयात आठवड्यातून दोनच दिवस सोनोग्राफी होत असल्याच्या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करत सदस्यांनी उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी रेडिओलॉजिस्ट डॉक्टरांची नेमणूक करावी, अशी जोरदार मागणी केली. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, अशी सूचना सदस्यांकडून आल्यानंतर सभापती यांनी आपण तसा प्रस्ताव शासनाकडे देऊ, असे सांगितले.


आमदार अतुलबाबांचे नक्की सहकार्य राहील...

कराड पंचायत समितीला जेथे जेथे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे सहकार्य हवे असेल, किंवा त्यांच्या माध्यमातून काही प्रश्न शासनाकडून सोडवून घ्यावयाचे असतील, तेथे तेथे त्यांचे निश्चित सहकार्य मिळेल, आणि प्रश्नही सुटलेले दिसतील, याचा शंभर टक्के विश्वास देतो, अशी ग्वाही भाजपाचे सदस्य धनंजय पाटील यांनी सभागृहात दिली.

पहिल्याच सभेत सदस्यांकडून अभ्यासपूर्ण मांडणी....

कराड पंचायत समितीचे सर्व सदस्य आणि सभापती, उपसभापती सर्वच नवनिर्वाचित आहेत. त्यांची पहिलीच मासिक सभा शुक्रवारी झाली. तथापि, या मासिक सभेत नवख्या सदस्यांनी अनेक प्रश्नावर अभ्यासपूर्ण विषय मांडले. जनहिताचे ठराव मांडताना अनेक विषयांची पोलखोल केली. अधिकाऱ्यांना नुसतेच धारेवर धरले नाहीतर त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक करत, अभिनंदनाचे ठरावही केले. विरोधातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सदस्यांनी चांगल्या कामासाठी सभागृहाला नक्कीच सहकार्य राहील, असे स्पष्ट केले. नूतन सभापती नंदाताई यादव यांनीही सभागृहात महत्त्वाच्या विषयावरची चर्चा घडवून आणली आणि अनावश्यक चर्चेत  वेळोवेळी हस्तक्षेप करत चर्चेला पूर्णविराम दिला.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#KaradNews #कराडपंचायतसमिती #चांगभलंन्यूज

#ChangbhalaNews #KaradPolitics 

#BJP #NCP #Congress #KaradKar #साताराजिल्हा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या