सोमवार पेठ रस्ता प्रकरणावरून खळबळ; बेकायदेशीर होर्डिंग, ड्रेनेज आणि नदीप्रदूषणावरही जोरदार चर्चा
कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कराड नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. १७) नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले गेले असले, तरी काही वादग्रस्त मुद्द्यांवरून सभागृहात वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.
सभेच्या प्रारंभी दुखवट्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली. मात्र, सुरुवातीपासूनच सोमवार पेठ येथील रस्ता रुंदीकरणाचा मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. नगरसेवक अजय पावसकर यांनी ६ मीटर मंजूर असलेला रस्ता ९ मीटर करण्याचा ठराव तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी संशयास्पदरीत्या मंजूर केल्याचा गंभीर आरोप केला. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता व्यक्त करत संबंधित ठराव तात्काळ रद्द करून चौकशी करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी विषय गांभीर्याने घेत सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, शहरातील बेकायदेशीर होर्डिंगचा मुद्दाही ऐरणीवर आला. अनधिकृत फलकांमुळे शहराचे विद्रूपीकरण होत असल्याची तक्रार नगरसेवकांनी केली. यावर कारवाई करताना काही पदाधिकाऱ्यांकडून प्रशासनावर दबाव आणला जात असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी दिली. नगरसेवक आशुतोष डुबल यांनी या संदर्भात ठोस धोरण आखण्याची मागणी केली.
सभेत ड्रेनेज व्यवस्थेवरूनही तीव्र चर्चा झाली. उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे यांनी शहरातील सांडपाणी व्यवस्थेतील त्रुटींवर लक्ष वेधले, तर विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांनी निकृष्ट दर्जाच्या कामांवर कडाडून टीका केली. अपूर्ण व निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी त्यांनी केली.
याचबरोबर मलकापूर नगरपालिकेकडील सांडपाणी नाल्यांमधून कराडमधील कृष्णा व कोयना नद्यांमध्ये मिसळत असल्यामुळे वाढणाऱ्या नदीप्रदूषणाचा गंभीर मुद्दाही सभेत उपस्थित करण्यात आला. या संदर्भात कराड पालिकेने कठोर भूमिका घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा रंगत असतानाच, शहर विकासासाठी महत्त्वाचे ठरणारे अनेक निर्णयही एकमताने मंजूर करण्यात आले. एकूण १५६ विषयांना मंजुरी देण्यात आली असून, त्यामध्ये शहरासाठी १० घंटागाड्यांची खरेदी, पालिकेसमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सुशोभीकरण, भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण, चार हायटेक स्वच्छतागृहे उभारणे, छत्रपती शिवाजी भाजी मंडई परिसरात शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी जागा उपलब्ध करून देणे, ‘नमो उद्यान’ उभारणी, तसेच पालिकेच्या सर्व शाळांचे सुशोभीकरण यांसारख्या योजनांचा समावेश आहे.
तसेच शहरात बीपीसीएलची विविध कामे युद्धपातळीवर राबविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#Karad #KaradNews #MunicipalCorporation #LocalPolitics #MaharashtraNews #ChangbhalaNews #KaradPalika #PoliticalNews #Development #BreakingNews #SataraNews #MaharashtraPolitics #UrbanDevelopment #CivicIssues #KaradUpdates

0 टिप्पण्या