केंद्र सरकारच्या राजकारणावर पृथ्वीराज चव्हाण यांची टीका; ठाकरे गटातील घडामोडींवर भाष्य
चांगभलं प्रतिनिधी | कराड
: देशातील विरोधी पक्षांमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि पक्षांतील संभाव्य फुटींमागे सत्ताधाऱ्यांचे राजकारण असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. लोकशाही व्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्या या प्रवृत्तीमुळे देशातील राजकीय वातावरण चिंताजनक बनत असल्याचे त्यांनी म्हटले.
कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील खासदारांच्या हालचालींचा संदर्भ देत, विरोधी पक्षांची एकजूट खिळखिळी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला. लोकसभा सदस्यसंख्या वाढविण्यासाठी आणि भविष्यातील राजकीय समीकरणे बदलण्यासाठी केंद्र सरकारला मोठ्या बहुमताची आवश्यकता असून, त्यासाठी विरोधकांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले.
भाजपवर टीका करताना त्यांनी निवडणूक प्रक्रियेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणुका निष्पक्षपणे पार पडत असल्याबाबत नागरिकांमध्ये शंका निर्माण होत असून, मतदान प्रक्रियेत पारदर्शकता वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सत्तेचे केंद्रीकरण वाढत असून लोकशाहीपेक्षा व्यक्तीकेंद्रित राजकारणाला प्राधान्य दिले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
राज्यातील विविध राजकीय पक्षांतील फुटींवर भाष्य करताना केंद्रीय तपास यंत्रणांच्या वापराबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. रोजगारनिर्मिती, शेती, महागाई आणि आर्थिक प्रश्नांवर केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात सरकारला यश आले नसल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारा वर्षांच्या कार्यकाळाचे मूल्यमापन करताना चव्हाण यांनी अर्थव्यवस्था, रुपयाचे मूल्य, महागाई आणि परराष्ट्र धोरण या मुद्द्यांवर सरकारवर टीका केली. केवळ परदेश दौरे आणि जाहिरातींमुळे विकास साध्य होत नसून प्रत्यक्षात जनतेच्या प्रश्नांवर उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
निवडणूक प्रक्रियेवर पैशांचा प्रभाव वाढल्याचा आरोप....
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्याचा दबाव सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक शक्तीचा वापर होत असल्याचे सांगत त्यांनी लोकशाही प्रक्रियेची शुचिता जपण्याची गरज व्यक्त केली. भ्रष्टाचारातून निर्माण होणारा पैसा निवडणूक व्यवस्थेवर परिणाम करत असल्याचा आरोप करत त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभय जगताप यांना पाठिंबा जाहीर केला व मतदारांनी विवेकाने मतदान करावे, असे आवाहन केले.
कृष्णा नदीतील पाण्याच्या रंगबदलाची चौकशी करण्याची मागणी...
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग बदलल्याच्या प्रकाराबाबत प्रशासनाने तातडीने सखोल तपास करावा, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. काही ग्रामपंचायतींनी नागरिकांना नदीचे पाणी पिण्यासाठी वापरणे टाळण्याचा इशारा दिल्याचे नमूद करत त्यांनी या प्रकरणाची वस्तुस्थिती समोर येणे आवश्यक असल्याचे सांगितले. नदीत रासायनिक पदार्थ मिसळल्याच्या चर्चांमुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली असून, संबंधित घटनेमागील कारणे शोधून जबाबदार घटकांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.

0 टिप्पण्या