राष्ट्रवादी (श. प. ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे संस्थापक पॅनेलच्या बोरगाव येथील प्रचारसभेत असं का म्हणाले....
.....मगच आम्हाला मते द्या - अविनाश मोहिते नेमकं काय म्हणाले
चांगभलं प्रतिनिधी | बोरगाव
"कृष्णा सहकारी साखर कारखान्याची यावेळीची निवडणूक काहीशी वेगळी आहे. काल-परवापर्यंत एकमेकांच्या विरोधात लढणारे सगळे दिग्गज एका बाजूला गेले आहेत. मात्र 'एक नारी सबको भारी...!' या कारखान्याच्या सभासदांच्या हितासाठी मैदानात उतरलेल्या अविनाश मोहिते यांच्या पाठीशी 'सत्यवानाची सावित्री' बनून अर्चनाताई मोहिते खंबीरपणाने उभा राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. खरं सांगतो, ज्यावेळी सगळे दिग्गज एका बाजूला जातात ना, त्यावेळेस समजून जा विरोधकांनी तुमची धास्ती घेतली आहे" असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
बोरगाव येथे आयोजित कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेलच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी पॅनलच्या नेत्या उमेदवार सौ. अर्चनाताई मोहिते, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते, माजी व्हाइस चेअरमन सुरेश पाटील, महेश पाटील, सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य अजितराव पाटील-चिखलीकर, बंडानाना जगताप, गजानन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले, बिहारी कामगारांना हटवून कारखान्यातील रोजगाराच्या संधी स्थानिक शेतकरी कुटुंबातील युवकांना मिळाल्या पाहिजेत, यासाठी मी भूमिका घेईन. केंद्र सरकारच्या महिला आरक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या धोरणाचा दाखला देत, महिला उमेदवाराला बिनविरोध संधी देण्याचे धैर्य सत्ताधाऱ्यांनी दाखवायला हवे होते, अशी टिप्पणीही त्यांनी केली. विधान परिषदेसह कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालातून सातारा व सांगली जिल्ह्यावासियांचा राजकीय संदेश देशभर जाईल आणि हीच भाजप विरोधातील परिवर्तनाची नवी सुरुवात ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
एक संधी द्या, कारखान्याचा हिशोब ही चोख ठेवेन...!
यावेळी बोलताना सौ. अर्चनाताई मोहिते यांनी मी अविनाश मोहिते यांची पत्नी असली तरी या कारखान्याची एक सभासद म्हणून तुमच्यासमोर उभा असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, महिला आज कोणत्याही क्षेत्रात पाठीमागे नाहीत. त्यांना संधी मिळाली तर त्या कर्तृत्व दाखवू शकतात. एक महिलाच कोणावर अन्याय होऊ देत नाही आणि कोणाला अन्याय करू ही देत नाही. संसाराचा हिशोब चोख ठेवण्याचे काम तीच करत असते. सभासद माय माऊलींनी या निवडणुकीत मला एक संधी द्यावी, सभासदांचे हित कसे साधायचे असते, कारखान्याचा कारभार कसा चालवायचा असतो, आणि हिशोब कसा चोख ठेवायचा असतो ते दाखवून देईन ” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
तुम्ही तुलना करा, पटलं तर आम्हाला मत द्या......
माजी चेअरमन अविनाश मोहिते म्हणाले, सभासद बंधुनो संस्थापक पॅनेलच्या पाच वर्षांच्या कारभाराची तुलना विरोधकांच्या अकरा वर्षांच्या कारभाराशी करा. पडताळून पहा, तुम्हाला आमचा कारभार योग्य वाटला, आम्ही केलेले काम योग्य वाटले, पटले तरच आम्हाला मतदान करा. तुम्ही संस्थापक पॅनेलला निवडून दिले तर, एफआरपी पेक्षा जादा दर, एकरी ७५०० रुपये पाणीपट्टी, १२० किलो उत्तम दर्जाची विनामूल्य साखर, पहिल्या तीन महिन्यातच रखडलेले शेअर ट्रान्सफर, आणि बैठकी पाणीपट्टी रद्द करण्याचे वचन संस्थापक पॅनेलने दिले आहे. ते आम्ही पूर्ण करणार आहे.
'जयवंत शुगर'वर एक रुपयाचे कर्ज नाही मग कृष्णावरच....
सभेत बंडानाना जगताप यांनी सत्ताधाऱ्यांच्या धोरणावर तिखट टीका केली. ते म्हणाले, कृष्णा कारखान्यात तुमची सत्ता. जयवंत शुगर ही तुमचा. पण जयवंत शुगर वर एक रुपयाचे कर्ज नाही, आणि कृष्णा कारखान्यावर ९७७ कोटींचे कर्ज कसे? याचे स्पष्टीकरण सभासदांना द्या. कारखान्यावरचे हे कर्ज म्हणजे सभासदांच्यावरच असलेले कर्ज आहे. कर्ज वाढत गेले की काय होते हे वेगळे सांगायला नको. या निवडणुकीत अविनाश मोहिते यांनी पॅनेल उभे केले नसते, विरोधकाची भूमिका मांडली नसती तर कारखान्याची खाजगीकरणाकडे वाटचाल सुरू झाली असती. त्यामुळे सभासदांनी आता सावध झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.
पंचायत समिती सदस्या स्वाती मदने म्हणाल्या, कारखान्यात सभासदाचे एखादे काम असेल तर अगोदर चेअरमन आहेत का? याची बाहेरूनच चौकशी करावी लागत असे. कारण बहुतेक वेळा विद्यमान चेअरमन हे सभासदांना कारखान्यात भेटत नसत. मात्र याउलट अविनाश मोहिते हे पूर्ण वेळ कारखान्यात सभासदांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी उपलब्ध असत. हा फरक लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे पूर्णवेळ कारखान्याचे काम पाहणाऱ्या अविनाशदादा मोहिते यांच्या मार्गदर्शनाखालील संस्थापक पॅनेलच्या सर्व उमेदवारांना सभासदांनी निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. बालाजी जगताप यांनी, महिला चेअरमन निवडून देण्याची ऐतिहासिक संधी सभासदांसमोर असल्याचे नमूद केले. प्रमोद पाटील यांनी, सत्ताधाऱ्यांकडे अनेक नेते झुकल्यामुळे सभासदांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचा दावा केला. तर सचिन कदम यांनी, संस्थापक पॅनेलच्या जाहीरनाम्यातील प्रत्येक आश्वासन पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, अपक्ष उमेदवार महेश पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत संस्थापक पॅनेलला जाहीर पाठिंबा दिला. तसेच लवंडमाची येथील काही सभासदांनी यावेळी संस्थापक पॅनेलमध्ये प्रवेश केला. सभेस अधिक पाटील, स्वप्नील पाटील, अनिल पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार जयसिंगराव शिंदे यांनी मानले.
आंतरराष्ट्रीय दर्जाची साखर कारखान्यात तयारच होत नाही मग ती देणार कशी?
संस्थापक पॅनेलने १२० किलो एक वन ग्रेडची साखर सभासदांना देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आमदारांनी चक्क 'आंतरराष्ट्रीय दर्जाची साखर आम्ही सभासदांना देऊ', असे सांगून टाकले. मात्र कारखान्यात आजवर कधीही आंतरराष्ट्रीय दर्जाची साखर तयारच झालेली नाही, तयार होत नाही, मग सभासदांना ती देणार कशी? त्यामुळे अशा भूलथापांना सभासद आता फसणार नाहीत, अशी टीका उदय शिंदे यांनी आमदार अतुलबाबा भोसले यांचे नाव न घेता केली. बोरगाव हे माजी मंत्री जयंतराव पाटील साहेब यांचे हार्ट आहे. साहेबांनी या निवडणुकीत अधिकृतरित्या कोणत्याही पॅनेलला जाहीर पाठिंबा दिलेला नाही, हे वास्तव आहे, मात्र साहेबांच्या मनात काय आहे! हे वाळवा तालुक्यातील सभासद आणि कार्यकर्ते जाणून आहेत. त्यामुळे येत्या २१ तारखेला नक्कीच भूकंप होईल, आणि या भूकंपाचा केंद्रबिंदू बोरगाव असेल, असेही उदय शिंदे यांनी सांगितले.
➖➖➖➖➖➖➖➖➖
#कृष्णाकारखानानिवडणूक२०२६ #कृष्णाकारखाना
#संस्थापकपॅनेल #चांगभलं #साप्ताहिकचांगभलं #चांगभलंन्यूज


0 टिप्पण्या