हैबत आडके | चांगभलं प्रतिनिधी सातारा
सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्हा प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाने घाटमाथा व दुर्गम भागांसाठी ऑरेंज व रेड अलर्ट दिल्यानंतर प्रशासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई आणि सातारा या पाच तालुक्यांतील सर्व अंगणवाड्या, बालवाड्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना आज (मंगळवार, दि. ७ जुलै २०२६ रोजी) एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून सखल भागात पाणी साचण्याच्या घटना वाढल्या आहेत. अनेक ग्रामीण व डोंगराळ भागांत दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत हा आदेश जारी केला आहे.
दरम्यान, कोयना धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम असून धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
मंगळवार, दि. ७ जुलै २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार कोयना धरणाची पाणीपातळी 2086 फूट 09 इंच (636.041 मीटर) इतकी नोंदविण्यात आली आहे. धरणात एकूण (Gross) 35.70 टीएमसी म्हणजे 33.92 टक्के पाणीसाठा असून उपयुक्त (Live) पाणीसाठा 30.58 टीएमसी म्हणजे 30.54 टक्के झाला आहे. धरणात सध्या तब्बल 93,020 क्युसेक्स (सुमारे 8.03 टीएमसी) पाण्याची आवक सुरू असून अद्याप धरणातून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.
धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या २४ तासांत कोयना येथे 319 मिमी, नवजा येथे 276 मिमी आणि महाबळेश्वर येथे 400 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर हंगामातील एकूण पर्जन्यमान अनुक्रमे कोयना 1314 मिमी, नवजा 1554 मिमी आणि महाबळेश्वर 1924 मिमी इतके झाले आहे.
कृष्णा नदीच्या पुरात वाहणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवले...
दरम्यान, सातारा तालुक्यातील मर्ढे येथे पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. मर्ढे-आणेवाडी पुलाजवळ कृष्णा नदीच्या पुरात दारूच्या नशेत असलेले शिवाजी शिंगटे (रा. मर्ढे) यांचा पाय घसरून ते नदीच्या वेगवान प्रवाहात वाहू लागले.
पुलावर बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस हवालदार आशिष कुमठेकर, पोलीस शिपाई प्रसाद शिंदे, होमगार्ड करण मोरे व किरण खवले यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. गावाच्या सरपंच सविता शिंगटे, उपसरपंच विक्रम शिंगटे, पोलीस पाटील महेश रोकडे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने संबंधित व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. या धाडसी बचावकार्यातून एका व्यक्तीचे प्राण वाचले असून परिसरातून पोलीस व ग्रामस्थांचे कौतुक होत आहे.
या घटनेनंतर मर्ढे पुलाजवळ अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बॅरिकेडिंग, सूचना फलक आणि नागरिकांना पुराच्या पाण्याजवळ न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
धोकादायक पर्यटनस्थळांवर प्रवेशबंदी...
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने धोकादायक पर्यटनस्थळे, धबधबे, तलाव, नदीकाठ आणि पूरग्रस्त भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घातले आहेत. सर्व अपघातप्रवण ठिकाणी 'प्रवेश निषिद्ध' आणि 'धोकादायक क्षेत्र' असे फलक लावण्याचे आदेश देण्यात आले असून प्रमुख पर्यटनस्थळांवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
दरडग्रस्त भागातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर...
जावळी तालुक्यातील दरडप्रवण बाहुले गावात डोंगराचा काही भाग कोसळल्यानंतर तेथील ९ कुटुंबांतील २३ नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.
तसेच बोंडारवाडी येथे मुसळधार पावसामुळे नैसर्गिक झरे सुरू झाल्याने ओढ्यालगत राहणाऱ्या ८ नागरिकांना मंदिरात सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
रस्त्यावरील खचाची तातडीने दुरुस्ती...
एम.डी.आर.-६४ मार्गावर भूमिगत पाण्याच्या निचऱ्यामुळे रस्त्याखाली भरावात खच (Settlement) झाल्याचे आढळून आले. प्रशासनाने तात्काळ पाईप टाकून पाण्याचा निचरा सुरळीत केला तसेच आवश्यक दुरुस्ती करून वाहतूक सुरक्षित करण्यात आली.
प्रशासनाच्या महत्त्वाच्या सूचना...
जिल्हा प्रशासनाने सर्व तहसील कार्यालये, नगरपरिषदा व पंचायत समित्यांचे आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांनी मुख्यालयी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप, दवंडी आणि स्थानिक प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून हवामानाचा अंदाज, धरण विसर्ग आणि नदीपात्रातील पाणीपातळीची माहिती नागरिकांपर्यंत सातत्याने पोहोचविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नागरिकांना विनाकारण घाटरस्त्यांवर प्रवास टाळावा, पूर आलेले ओढे-नाले व पुल ओलांडू नयेत, धोकादायक पर्यटनस्थळांपासून दूर राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
➖➖➖➖➖➖➖
Satara Heavy Rain Update Today, Satara Rain News, Satara Flood News, Satara School Holiday, Satara Weather Alert, Mahabaleshwar Rain, Patan Rain, Jawali Rain, Wai Rain, Krishna River Flood, Satara Collector Order, Satara Disaster Management, Satara News Today, Maharashtra Rain News, Satara Breaking News, सातारा पाऊस, सातारा पूरस्थिती, सातारा शाळांना सुट्टी, कृष्णा नदी पूर, जावळी दरड, महाबळेश्वर पाऊस, सातारा ताज्या बातम्या, चांगभलं न्यूज.
#SataraRain #SataraHeavyRain #SataraFlood #SataraNews #Mahabaleshwar #Patan #Jawali #Wai #KrishnaRiver #SchoolHoliday #WeatherAlert #MaharashtraRain #BreakingNews #ChangbhalaNews #सातारा #सातारापाऊस #पूरस्थिती #शाळांनासुट्टी #महाबळेश्वर #जावळी #कराड #चांगभलंNews #चांगभलंन्यूजपेपर
#चांगभलंसाप्ताहिक #साप्ताहिकचांगभलं #चांगभलंन्यूज





0 टिप्पण्या