हैबत आडके, कराड | दि. २२ नोव्हेंबर २०२५
कराड नगरपालिका निवडणूक २०२५ चा अंतिम टप्पा जवळ येत असताना, शहरातील राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे. गुरुवार-शुक्रवारी घडलेल्या दोन भेटींनी तर कराडचे राजकारण नव्या वळणावर नेले असून सर्वांचे लक्ष पाटण कॉलनीतील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानाकडे वळले आहे.
नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून झाकीर पठाण, भाजपकडून विनायक पावसकर, तर राष्ट्रवादी (शरद पवार गट)–शिंदेसेना आघाडीकडून राजेंद्रसिंह यादव हे प्रमुख दावेदार रिंगणात आहेत. त्यात शिंदेसेनेचे नगराध्यक्षपदाचे दावेदार रणजित पाटील हेही बंडखोरी करून स्वतंत्र उभे राहिल्याने चित्र आणखी गुंतागुंतीचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर कराड शहरात घडलेल्या दोन मोठ्या घटना चर्चेत आल्या आहेत.
पहिली मोठी घटना : रणजित पाटील यांची चव्हाण यांच्यासोबत भेट – राजकीय संकेत?
गुरुवारी सकाळी शिंदे सेनेचे बंडखोर उमेदवार रणजित पाटील यांनी अचानक पाटण कॉलनी गाठून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीत सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचे समजते. त्याचा तपशील समोर आला नसला तरी
या भेटीने अनेक प्रश्न निर्माण झाले असून शहरात जोरदार चर्चा सुरू आहेत.
दुसरी मोठी घटना : राजेंद्रसिंह यादव यांची चव्हाण यांच्यासोबत भेट – गठबंधन की रणनीती ?
याच भेटीनंतर अवघ्या २४ तासांत शुक्रवारी सकाळी-सकाळी शिवसेना शिंदे गट व यशवंत विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांनीही आपल्या समर्थकांसह पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला.
यावेळी माजी नगरसेवक हणमंत पवार व आघाडीतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत यादव यांनी दिलेला पाठिंबा निर्णायक ठरला होता. मात्र २०१९ व २०२४ मध्ये दोघांमध्ये निर्माण झालेली दरी सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे अशा संवेदनशील क्षणी चव्हाण–यादव भेटीला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे.
झाकीर पठाण काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात...
काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी झाकीर पठाण यांच्यावर विश्वास ठेवला असून, पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने ते थेट काँग्रेसच्या चिन्हावर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले आहेत. ते पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आणि जिल्हाध्यक्ष रणजीतभैया देशमुख यांचे विश्वासू आहेत. प्रदीर्घ काळ त्यांनी काँग्रेस संघटनासाठी काम केले आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर 'पृथ्वीराज चव्हाण यांचा खरा आशीर्वाद कोणाला मिळणार?' हा प्रश्न अधिकच गडद होत आहे.
‘पाटण कॉलनी’ निवासस्थान राजकारणाचा केंद्रबिंदू...
अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीच्या दरम्यान झालेल्या या सलग भेटीमुळे कराडमध्ये चर्चांना अक्षरशः उधाण आले आहे.
पाटण कॉलनी हे आता कराड नगरपालिकेच्या निवडणुकीतील 'नवे पॉवर सेंटर' ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
पुढील काही तास निर्णायक...
- प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या या भेटी निव्वळ “आशीर्वाद घेणे” आहेत की नव्या राजकीय समीकरणांची चाहूल आहे?
- पडद्यामागे नेमक्या कोणत्या घडामोडी घडू पाहत आहेत?
- निवडणुकीत जुन्याच समीकरणांना रंग येणार की नवी समीकरणे उदयाला येणार याची उत्सुकता वाढत चालली आहे.
काहीही असले तरी सध्या मात्र कराडचे राजकारण एकाच मुद्द्यावर स्थिरावले आहे की -
'पृथ्वीराज चव्हाण यांचा आशीर्वाद नेमका कोणाला?'
#KaradElection2025 #KaradMunicipality #PatanColony #PrithvirajChavan #RanjitPatil #RajendraSinghYadav #ZakirPathan #KaradPolitics #ChangbhalaNews



0 टिप्पण्या