कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात केवळ विकासकामांपुरते मर्यादित न राहता थेट जनतेच्या आरोग्याशी नाते जोडणारे व्यापक सामाजिक उपक्रम उभारले जात असतील, तर त्यामागे ठाम नियोजन, संवेदनशील नेतृत्व आणि सातत्यपूर्ण कार्यशैली असावी लागते. हीच बाब गेल्या काही दिवसांत कराड तालुक्यातील वारुंजी विभागातील तब्बल १३ गावांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत महाआरोग्य शिबिरांमधून प्रकर्षाने समोर आली आहे.
कराड दक्षिणचे कार्यक्षम आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कराड व गांधी फाउंडेशन, कराड यांच्या सहकार्यातून आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. अरुणाकाकी दिलीपराव चव्हाण यांच्या माध्यमातून आयोजित या शिबिरांनी वारूंजी विभागातील ग्रामीण आरोग्यसेवेला नवे परिमाण दिले आहे.
वारूंजीसह वनवासमाची, धोंडेवाडी, खोडशी, जखीणवाडी, कालेटेक अशा वारूंजी विभागातील १३ गावांमध्ये सलग राबवण्यात आलेल्या या शिबिरांमधून हजारो गरजू रुग्णांना मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि शस्त्रक्रियेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात खर्चाअभावी दुर्लक्षित राहणाऱ्या रुग्णांसाठी ही शिबिरे अक्षरशः जीवनदायी ठरली आहेत.
वनवासमाची येथे पार पडलेल्या शिबिरात ४३२ ग्रामस्थ व ८८ विद्यार्थ्यांना लाभ, तर ६२ मोतीबिंदू रुग्ण, २५० जणांना चष्मे, २८५ रुग्णांची बीपी-शुगर तपासणी, ९२ पुरुष व १४५ महिलांचे ECG, ८४ जणांची ऑर्थोपेडिक तपासणी करण्यात आली. याच शिबिरातून ३१ ग्रामस्थांना पुणे येथे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले, हे या उपक्रमाचे ठळक यश ठरले.
धोंडेवाडी येथे झालेल्या शिबिरात ९४७ ग्रामस्थांनी लाभ घेतला, ज्यामध्ये ५२० जणांना चष्मा वाटप, २१२ फिजिओथेरपी, ४३५ बीपी-शुगर तपासण्या आणि २३६ हाडांच्या तपासण्या करण्यात आल्या.
खोडशी येथे आयोजित शिबिरात ६१५ ग्रामस्थांना लाभ, तर जखीणवाडी येथे ७१८ ग्रामस्थांनी या आरोग्य सुविधांचा लाभ घेतला. जखीणवाडी येथे आयुष्यमान भारत नोंदणी ५५ जणांची करण्यात आली, ही बाब ग्रामीण आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली.
या सर्वच शिबिरांमध्ये मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मा वाटप, मोतीबिंदू व लेझर नेत्र शस्त्रक्रिया, वंध्यत्व (IVF) तपासणी, पोट विकारांच्या निधनासाठी एन्डोस्काॅपी, हृदयरोगाच्या निदानासाठी टू डी इको, एन्जीओग्राफी, ईसीजी तपासण्या, मोफत औषध वाटप, रक्तदान शिबिरे व ५ लाखांचा अपघाती विमा अशा विविध सर्वांगीण सुविधा पुरवण्यात आल्या.
या संपूर्ण उपक्रमांमागे सौ. अरुणाकाकी दिलीपराव चव्हाण यांची सामाजिक बांधिलकी, थेट जनसंपर्क आणि गरजूंना प्रत्यक्ष मदत ही कार्यपद्धती केंद्रस्थानी राहिली. एखाद्या राजकीय कार्यकर्त्याच्या भाषणांपेक्षा आरोग्यसेवेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची ही रणनीती आज वारूंजी विभागातील तब्बल १३ गावांत प्रभावी ठरली असून, या माध्यमातून अरुणाकाकी चव्हाण यांच्यातील विश्वासार्ह, सेवाभावी आणि कार्यक्षम नेतृत्वाची प्रतिमा सामाजिक दृष्ट्या अधिक भक्कम होताना दिसत आहे.
या महाआरोग्य शिबिरांनी वारूंजी विभागातील गावागावात केवळ आजारांवर उपचारच केले नाहीत, तर या विभागातील ग्रामीण जनतेच्या मनात त्यांच्यासाठी सदैव कार्यरत व कार्यतत्पर असलेल्या नेतृत्वाबद्दलची ठाम आदराची भावना निर्माण केली गेली आहे. हीच सामाजिक गुंतवणूक सौ. अरुणाकाकी दिलीपराव चव्हाण यांच्यासाठी येणाऱ्या काळात मोठीच फायद्याची ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#कराड #वारुंजीपरिसर #मोफतमहाआरोग्यशिबीर
#ग्रामीणआरोग्य #आरोग्यसेवा #सामाजिकबांधिलकी
#जनतेसाठीसेवा #ArunakakiChavan
#ArunakakiDilipaRaoChavan
#AtulBabaBhosale
#SahyadriHospitalKarad
#GandhiFoundationKarad
#ग्रामीणविकास #सेवाभावीनेतृत्व
#ChangbhalaNews #चांगभलंन्यूज





0 टिप्पण्या