कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कराड शहरातील रैनाक गल्ली परिसरात सोहेल बारस्कर यांच्या घराला अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट घरातून बाहेर पडत असताना चार निष्पाप चिमुकल्यांचे प्राण धोक्यात आले होते. मात्र या संकटाच्या क्षणी कराड शहरातील भाजपाचे नगरसेवक श्री. गणेश पवार, त्यांचे सहकारी श्री. मोहसीन बागवान तसेच कराड नगरपालिकेचे कर्मचारी श्री. अक्षय चावरे व श्री. दिनेश कारोसे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दाखवलेल्या धैर्यामुळे मोठा अनर्थ टळला.
आगीच्या भयानक वातावरणात कोणताही विलंब न करता घरात प्रवेश करून या चारही मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यांच्या या प्रसंगावधानामुळे व धाडसामुळे केवळ चार कुटुंबांचेच नव्हे, तर संपूर्ण शहराचे डोळे पाणावले. संकटाच्या क्षणी दाखवलेली ही माणुसकी आणि कर्तव्यनिष्ठा समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या साहसी कार्याची दखल घेत कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आज संबंधित सर्वांचा यथोचित सत्कार केला. यावेळी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी श्री. गणेश पवार, श्री. मोहसीन बागवान, श्री. अक्षय चावरे आणि श्री. दिनेश कारोसे यांच्या धैर्याचे मनापासून कौतुक करत शाबासकी दिली. संकटसमयी अशा प्रकारचे धाडस करणारे नागरिक हे समाजाचे खरे हिरो असून, त्यांच्यामुळेच माणुसकी जिवंत आहे, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
सामान्य नागरिक आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली ही एकजूट आणि सामाजिक जबाबदारी कराड शहरासाठी अभिमानास्पद ठरत असून, या घटनेमुळे समाजात माणुसकी, साहस आणि जबाबदारीची भावना अधिक दृढ होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#कराड #रैनाकगल्ली #मानवीधैर्य
#साहस #माणुसकी #GaneshPawar
#MohsinBagwan #AkshayChavare
#DineshKarose #AtulBabaBhosale
#ChangbhalaNews

0 टिप्पण्या