कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कराड येथील अग्रगण्य शिक्षण संस्था कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सतर्फे यावर्षी विविध नाविन्यपूर्ण आणि देशभक्तीची भावना जागवणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची भव्य संविधान रॅली, देशभक्तीपर नृत्याविष्कार तसेच दिल्लीतील राजपथ आणि इंडिया गेटची हुबेहूब प्रतिकृती ही या सोहळ्याची प्रमुख आकर्षणे असणार आहेत, अशी माहिती कॉलेज प्रशासनाने आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस ज्ञानांगण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. महेश खुस्पे, उपाध्यक्षा सौ. मंजिरी खुस्पे आणि सचिव अॅड. सतीश पाटील उपस्थित होते.
संविधानातील मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने कॉलेजच्या विद्यार्थ्यांमार्फत शहरात भव्य संविधान रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये संविधानाची प्रतिकृती, तसेच संविधानावर आधारित फलक आणि घोषणांच्या माध्यमातून विद्यार्थी नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहेत.
दिल्ली येथील राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलनाचा अनुभव स्थानिक पातळीवर नागरिकांना घेता यावा, यासाठी कॉलेज कॅम्पसमध्ये राजपथाची भव्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. याचबरोबर, दिल्लीतील ऐतिहासिक इंडिया गेटची हुबेहूब प्रतिकृती कॉलेज परिसरात उभारण्यात येणार असून, यामुळे विद्यार्थ्यांना व कराडच्या नागरिकांना राजधानीतील राष्ट्रीय सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.
देशाच्या विविधतेतून एकता अधोरेखित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विशेष देशभक्तीपर नृत्य प्रकार सादर करण्याची तयारी केली आहे. ही नृत्य सादरीकरणे रॅलीदरम्यान परिसरातील मुख्य तीन ठिकाणी देशभक्तीपर गीतांच्या तालावर सादर केली जाणार आहेत.
प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजता कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कराड येथे ध्वजारोहणानंतर या सर्व उपक्रमांना अधिकृत सुरुवात होणार आहे.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन ज्ञानांगण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. महेश खुस्पे, उपाध्यक्षा सौ. मंजिरी खुस्पे, सचिव अॅड. सतीश पाटील आणि संचालिका कु. मैथिली खुस्पे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या राष्ट्रीय उत्सवात कराडमधील नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कॉलेज प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#कराड #प्रजासत्ताकदिन #KotaJuniorCollege
#संविधानरॅली #RajpathReplica #IndiaGateReplica
#देशभक्ती #शैक्षणिकउपक्रम
#ज्ञानांगणएज्युकेशनसोसायटी #ChangbhalaNews

0 टिप्पण्या