🔴 ताज्या बातम्या
कराड नगरपरिषद निवडणूक चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन वाढले मुख्यमंत्री पुण्यात कार्यक्रम करणार भिवंडीमध्ये हल्ल्याचा प्रकार समोर नाशिकमध्ये पावसामुळे अपडेट पुणे महापालिकेत नवीन योजना जाहीर मुंबईत नवीन प्रकल्पाची घोषणा कोल्हापूरमध्ये पाणी प्रश्न तीव्र सातारा जिल्हा परिषद निवडणूक: सुधारित मतदार यादी जाहीर भाजपला थेट आव्हान: काँग्रेस स्वबळावर लढणार कराड पोलिसांची कारवाई: सैदापूर येथे गावठी पिस्तूल जप्त मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज तांबवे फाटा येथे ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या सूचना: कर्तव्य जबाबदारीने पार पाडा पुणे महानगरपालिका: नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

Hot Posts

अखंड सौभाग्याच्या वस्यासाठी चाफळला सुवासिनींची गर्दी; सीतामाई यात्रा उत्साहात संपन्न

 

चाफळ श्रीराम मंदिरात सीतामाईच्या दर्शनासाठी नऊवारी साड्यांमध्ये सजलेल्या सुवासिनी महिलांची गर्दी

चाफळ -कराड | चांगभलं वृत्तसेवा

चाफळ येथील संपूर्ण महाराष्ट्रासह परदेशी पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या पवित्र तीर्थक्षेत्र श्रीराममंदिरात बुधवारी सीतामाई यात्रेचे आयोजन मोठ्या भक्तिभावात आणि उत्साही वातावरणात पार पडले. तीनहून अधिक दशकांची परंपरा कायम राखत, अखंड सौभाग्याचे लेणे घेण्यासाठी हजारो सुवासिनी महिला नऊवारी साड्यांच्या वेशभूषेत स्नेहपूर्वक एकत्र आल्या होत्या.
मकरसंक्रांतीनिमित्त सीतामाईचे दर्शन घेऊन अखंड सौभाग्याचा वसा घ्यायचा, ही श्रद्धा आजही महिलांमध्ये तितक्याच दृढतेने जपली जात आहे. हळदी-कुंकवाने लाल-पिवळे झालेल्या मंदिर परिसरात ‘तीळगुळ घ्या, गोड गोड बोला’, ‘तीळ नव्हे हलवा, येता-जाता बोलवा’ अशा स्नेहपूर्ण उद्गारांनी वातावरण अक्षरशः दणाणून गेले होते. महिलांनी एकमेकींना आलिंगन देत आनंद व्यक्त केला.
पर्यटनस्थळाचा ‘ब’ वर्ग दर्जा लाभलेल्या तीर्थक्षेत्र चाफळ येथील श्रीराम मंदिरामध्ये सन १९८५ पासून महिलांच्या संकल्पनेतून सीतामाई यात्रेची परंपरा सुरू झाली आहे. प्रतिवर्षी वाढत चाललेली महिलांची संख्या, तसेच नववधूंची होणारी भर यामुळे या यात्रेला आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. सीतामाईकडून अखंड सौभाग्याचा वसा घेतल्यास सौभाग्य टिकून राहते, असा दृढ विश्वास महिलांमध्ये आजही आहे. सलग तीन वर्षे मकरसंक्रांतीला सीतामाई दर्शनाचे व्रत केल्यास ते फलदायी ठरते, अशी श्रद्धा असल्याने दरवर्षी भाविक महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.


सीतामाई यात्रेसाठी मंदिराच्या आवारात सकाळपासूनच महिलांची मोठी गर्दी झाली होती. श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या वतीने ववसा पूजेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी बारानंतर महिलांची गर्दी वाढल्याने सुवासिनींनी मिळेल त्या जागी विडे मांडून मनोभावे पूजा केली.
भरजरी काठांच्या साड्या, सुवर्णालंकार, केसात फुलांचे सुगंधी गजरे अशा सजलेल्या वेशभूषेत असंख्य महिलांनी ववसा व विडा घेत सीतामाईचे दर्शन घेतले. संक्रांतीच्या सुगडीमध्ये तीळ, गाजर, गूळ, बोरे, ऊस, पावटा, गव्हाच्या लोंब्या, शेंगा, हरभरा, बिबी, घेवडा आदी साहित्य अर्पण करून महिलांनी श्रद्धेने वसा घेतला. सुवासिनींनी प्रथम सीतामाईस ओवाळले आणि त्यानंतर इतर सुवासिनींना ओवसले. खाऊच्या पानावर खोबरे, खारीक, बदाम, सुपारी, हळदी-कुंकू ठेवून पाच सौभाग्यवतींच्या हातून ओट्यात घालण्याची पारंपरिक पद्धत यावेळी मोठ्या भक्तिभावात पार पडली.
सीतामाई दर्शनासाठी ट्रस्टने बॅरिकेट्सची सोय केली होती. तसेच पिण्याच्या पाण्याची व दर्शन शिस्तबद्ध पद्धतीने व्हावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. या यात्रेसाठी सातारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर सुवासिनी दाखल झाल्या होत्या. संक्रांतीला सीतामाईचे दर्शन घेतल्यास सौभाग्य अखंड टिकते, या श्रद्धेमुळे मंदिर परिसरात सर्वत्र ‘तीळगुळ घ्या, गोड बोला’ आणि ‘तीळ नव्हे हलवा, येता-जाता बोलवा’ या स्नेहपूर्ण घोषणा ऐकू येत होत्या.


महिलांना दर्शनासाठी ओळीने मंदिरात सोडण्यासाठी श्री समर्थ विद्यालयाचे आरएसपी विद्यार्थी, तीन पोलीस अधिकारी, २५ महिला पोलीस, तसेच होमगार्ड यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रांताधिकारी सोपान टोम्पे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील आणि तहसीलदार अनंत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले, चाफळ व मल्हारपेठ पोलीस स्टेशनचे ४० महिला व पुरुष कर्मचारी आणि होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
नारळीची बाग व मंदिर परिसरात वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. यात्रेदरम्यान खेळणी, मिठाई, नारळ, तीळगुळ व इतर वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आले होते. महिलांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कराड, पाटण, वाई, वडूज, फलटण, मेढा, कोरेगाव, सातारा, पारगाव खंडाळा आगारातून भाविक महिलांसाठी जादा एसटी बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
खबरदारी म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन भोसुरे यांच्या मार्गदर्शनाखाली २० कर्मचारी वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी कार्यरत होते. ही यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुभाषराव जोशी, कार्यकारी विश्वस्त अमरसिंह पाटणकर, विश्वस्त दिलीप पाठक, व्यवस्थापक अरुण गायकवाड, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#चाफळ #सीतामाईयात्रा #श्रीराममंदिर
#मकरसंक्रांत #सुवासिनी #अखंडसौभाग्य
#हळदीकुंकू #सातारा #धार्मिकवारसा
#मराठीसंस्कृती #ChangbhalaNews #चांगभलंन्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या