कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यामंदिर यांच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन ‘साज कलेचा, उत्सव आनंदाचा’ हे सोमवार, दि. ५ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात व कलाविष्कारांच्या रंगतदार सादरीकरणात पार पडले.
यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल), कराड येथे संपन्न झालेल्या या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सीए. शिरीष गोडबोले, उपाध्यक्ष श्री. तुकाराम चव्हाण, सचिव श्री. अनिल कुलकर्णी, डॉ. श्रीकृष्ण ढगे, संतोष देशपांडे, गीतांजली तासे तसेच संस्थेचे सर्व विश्वस्त यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी पालक, हितचिंतक, देणगीदार व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रुपाली तोडकर यांनी मान्यवर व उपस्थितांचे स्वागत केले.
वार्षिक स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणारे प्रभावी व्यासपीठ असून, यंदाचे स्नेहसंमेलन विशेषतः संस्मरणीय ठरले.
‘साज कलेचा, उत्सव आनंदाचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, स्वागत नृत्य, लोककला, लोकनृत्य, देशभक्तिपर गीते, पोवाडा, शेतकरी गीत, भारुड गायन, प्रबोधनपर गीते आदी विविध कला प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
शिवकन्या, भारुड, पोवाडा तसेच निसर्गाचे वर्णन करणाऱ्या गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. अखेरच्या ‘छावा’ चित्रपटातील गीताच्या सादरीकरणाने प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अनेकांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिल्याची भावना यावेळी दिसून आली.
विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे पालकही भावूक झाले. आपल्या मुलांमधील कलागुण प्रत्यक्ष पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. योगिनी कुलकर्णी, सौ. निलिमा पाटील, सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलनासारखे उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सौ. निलिमा पाटील यांनी आभार प्रदर्शन करून स्नेहसंमेलनाची सांगता झाली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#सरस्वतीविद्यामंदिर #स्नेहसंमेलन2026
#साजकलेचाउत्सवआनंदाचा #कराडन्यूज
#शैक्षणिकबातमी #विद्यार्थीकलागुण
#संस्कृतिककार्यक्रम #ChangbhalaNews



0 टिप्पण्या