भारतीय दूतावास व महाराष्ट्र शासनाकडून मदतीचे प्रयत्न सुरू
कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
सातारा जिल्ह्यातील कराड येथील एका विमा कंपनीचे तब्बल २१ कर्मचारी सध्या दुबई येथे अडकून पडले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वास्तव्यास असलेल्या त्यांच्या हॉटेलच्या शेजारी स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.
स्फोटानंतर सुरक्षेच्या कारणास्तव संबंधित हॉटेलमधील पाहुण्यांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कराडमधील या कर्मचाऱ्यांची स्थिती अनिश्चित असून त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हे सर्व कर्मचारी अधिकृत कामानिमित्त किंवा पर्यटनासाठी दुबई येथे गेले होते. मात्र अचानक घडलेल्या घटनेमुळे ते सध्या हॉटेलमध्येच थांबण्यास भाग पडले आहेत. स्थानिक प्रशासनाने परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला असून हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
दरम्यान, कुठलाही भारतीय नागरिक जो या भागात प्रवासी किंवा पर्यटक म्हणून गेला असेल आणि अडचणीत सापडला असेल, त्याने तात्काळ भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकारच्यावतीनेही या घटनेची दखल घेण्यात आली असून अबुधाबी येथील भारतीय दूतावास यांच्या माध्यमातून संबंधित नागरिकांना आवश्यक ती मदत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
कराडमधील संबंधित विमा कंपनीकडूनही आपल्या कर्मचाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत असून त्यांची सुरक्षितता हीच प्राथमिकता असल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेबाबत अधिकृत माहिती आणि पुढील घडामोडींची प्रतीक्षा असून, सर्व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या कुटुंबीयांकडून प्रार्थना व्यक्त करण्यात येत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#KaradNews #Dubai #War #KaradCity
#ChangbhalaNews #चांगभलंन्यूज


0 टिप्पण्या