कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
सातारा जिल्हा परिषदेत प्रथमच भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवल्यानंतर नव्या नेतृत्वाने कार्याचा श्रीगणेशा ऐतिहासिक पद्धतीने केला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगम येथील समाधीस्थळी जाऊन अभिवादन करत विकासाभिमुख प्रशासनाचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
नव्या पदाधिकाऱ्यांच्या सन्मानासाठी कराड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात आमदार डॉ. अतुल भोसले आणि आमदार मनोज घोरपडे उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. प्रियाताई शिंदे आणि उपाध्यक्ष राजूभैय्या भोसले यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकजुटीने काम करण्याचा संदेश देण्यात आला.
आमदार डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले की, जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपवर दाखवलेला विश्वास विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरवला जाईल. सातारा जिल्हा राज्यात आदर्श ठरावा, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू केले जाईल. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये समन्वय साधून विकासाला गती देण्याचा प्रयत्न राहील.
ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, रस्ते व इतर मूलभूत सुविधांशी संबंधित प्रलंबित प्रश्न सोडवण्यावर भर दिला जाईल. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय ठेवला जाईल.
आमदार मनोज घोरपडे यांनी सांगितले की, यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेल्या पंचायतराज व्यवस्थेच्या तत्वांना अनुसरून जिल्हा परिषदेत पारदर्शक आणि लोकाभिमुख कामकाज राबवले जाईल. ग्रामीण नागरिकांच्या जीवनमानात बदल घडवून आणणे हेच या सत्तेचे मुख्य उद्दिष्ट असेल.
अध्यक्षा प्रियाताई शिंदे यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्यामुळे विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. सर्व घटकांना सोबत घेऊन सातारा जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
उपाध्यक्ष राजूभैय्या भोसले यांनीही ग्रामीण विकासाला प्राधान्य देत प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. विविध विभागांमधील समन्वयातून कामांची अंमलबजावणी वेगाने केली जाईल, असे त्यांनी सांगितले.



0 टिप्पण्या