सातारा | चांगभलं वृत्तसेवा
देशभरात यंदा होणाऱ्या जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत जिल्हा परिषदांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांवर पूर्णतः स्थगिती लागू केली आहे. त्यामुळे गट-क आणि गट-ड संवर्गातील कर्मचारी तसेच शिक्षक यांना यंदा बदली प्रक्रियेला सामोरे जावे लागणार नाही.
जनगणना ही केंद्र सरकारची महत्त्वाची आणि व्यापक प्रक्रिया असून ती सुरळीत व वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असते. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदांमधील शिक्षक आणि कर्मचारी यांच्यावर जनगणनेची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या बदल्या केल्यास कामात अडथळे निर्माण होऊ शकतात, हे लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारच्या गृह विभागाकडून मिळालेल्या सूचनांनुसार, जनगणना अधिनियम १९४८ आणि जनगणना नियम १९९० अंतर्गत येणारी वैधानिक कर्तव्ये अचूक आणि प्रभावीपणे पार पाडण्यासाठी स्थिर मनुष्यबळ आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार, जनगणना कार्याशी संबंधित जिल्हा परिषदांमधील गट-क व गट-ड संवर्गातील सर्व कर्मचारी आणि शिक्षक यांची २०२६ सालातील सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबवू नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उपसचिव वैशाली डिगे यांनी अधिकृत पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. या पत्रात, जनगणना कार्य निर्विघ्न आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या कार्यक्षेत्रातच ठेवण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे प्रशासनिक स्थैर्य राखण्यास मदत होणार असून जनगणनेचे काम अधिक प्रभावीपणे पार पाडले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#साताराजिल्हापरिषद #SataraNews #KaradNews
#जिल्हापरिषदशिक्षक #शिक्षकबदल्यास्थगित #चांगभलं
#चांगभलंन्यूज #ChangbhalaNews

0 टिप्पण्या