सातारा | चांगभलं वृत्तसेवा
राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषयाचे अध्यापन प्रत्यक्षात सुरू आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी शिक्षण विभागाने व्यापक तपासणी मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या तपासणीसाठी विभागाकडे गटशिक्षणाधिकारीपासून विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांचे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहे.
राज्य सरकारने २०२० मध्ये लागू केलेल्या कायद्यानुसार, इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सर्व शाळांमध्ये मराठी विषय शिकवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने मराठी विषयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. मात्र, काही खासगी इंग्रजी माध्यम शाळांमध्ये या नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आले आहे.
या पार्श्वभूमीवर नियमभंग करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईची तयारी शासनाने दर्शवली आहे. अधिनियमाचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याबरोबरच त्यांची मान्यता किंवा ‘ना हरकत प्रमाणपत्र’ रद्द करण्याची तरतूद आहे. यासाठी शालेय शिक्षण विभागाने स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित केली असून, आवश्यक ते अधिकार शिक्षण आयुक्तांना प्रदान करण्यात आले आहेत.
तसेच मराठी विषयासाठी पात्र शिक्षकांची नियुक्ती करणेही शाळांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. राज्यभरात सुमारे १८ हजार खासगी शाळा कार्यरत असून, या सर्व शाळांची प्रत्यक्ष भेट देऊन पडताळणी केली जाणार आहे. यासाठी विशेष तपासणी पथके तयार केली जाणार असून, नव्याने नियुक्त होणारे केंद्रप्रमुखही या मोहिमेत सहभागी होणार आहेत.
या कारवाईमुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी विषयाची प्रभावी अंमलबजावणी होईल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#EnglishSchool #SchoolNews #Maharashtra
#ChangbhalaNews #चांगभलंन्यूज
#शिक्षणविभाग #मराठीसक्ती

0 टिप्पण्या