राहुल गांधींकडून तब्येतीची विचारपूस; पुन्हा सक्रिय होण्याचे केले आवाहन
चांगभलं प्रतिनिधी | नाशिक
लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. खा. राहुल गांधी यांनी महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान नाशिक येथे भेट देत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने २४ ऑगस्टपासून आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराला भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी सविस्तर चर्चा करून महाराष्ट्रासमोरील विविध ज्वलंत प्रश्नांचा आढावा घेतला.
या प्रसंगी माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्याशी राज्यातील सद्यस्थिती तसेच जनतेसमोरील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत सखोल चर्चा केली. बैठकीदरम्यान महाराष्ट्रातील SIR प्रक्रिया, शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण, महिला व बालकांवरील गुन्ह्यांमध्ये होत असलेली वाढ, शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प तसेच नाशिक कुंभमेळ्याच्या खर्चातील कथित अनियमितता व भ्रष्टाचार या विषयांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती, बेरोजगारी आणि महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नांवरही चर्चा झाली. या समस्यांबाबत काँग्रेस पक्षाने अधिक प्रभावीपणे जनतेच्या बाजूने उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
तसेच राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्ष हा जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असून विरोधी पक्ष म्हणून लोकांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करत राहील, असा विश्वास व्यक्त केला. शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय्य मागण्यांसाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून लढा देईल तसेच जनतेच्या आवाजाला अधिक बळ देण्याचे काम करत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक घडामोडींवर झालेल्या या चर्चेत पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील वास्तव परिस्थिती राहुल गांधी यांच्या निदर्शनास आणून देत जनहिताच्या प्रश्नांवर प्रभावी लढा उभारण्याची गरज अधोरेखित केली. काँग्रेस संघटना अधिक मजबूत करून राज्यातील जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
पुन्हा सक्रियपणे काम करण्याचे आवाहन...
यावेळी राहुल गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या तब्येतीची आपुलकीने विचारपूस केली. राज्यातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींमध्ये त्यांचा अनुभव व मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी पुन्हा सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले.
➖➖➖➖➖➖
#पृथ्वीराजचव्हाण #राहुलगांधी #राष्ट्रीयकाँग्रेस #चांगभलंन्यूज #चांगभलंन्यूजपेपर #ChangbhalaNews #Karad

0 टिप्पण्या